मुरुड येथे लोनच्या बहाण्याने नागरिकाची १२ लाख ७४ हजार रुपयांची सायबर फसवणूक!
अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल
मुरुड-रायगड, दि. ३१ (प्रतिनिधी) :- कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चालला असून, मुरुड परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरज नसतानाही बँकेतून परस्पर लाखोंचे कर्ज मंजूर करून घेत, तक्रारदाराच्या खात्यातून तब्बल १२ लाख ७४ हजार ३३७ रुपयांची रक्कम परस्पर लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तवाडी, शिवाजी चौक येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी यांच्या मोबाईल क्रमांकावर एका अज्ञात इसमाचा फोन आला होता. संशयित आरोपीने फिर्यादी यांना अत्यंत कमी कागदपत्रांत ५ लाख रुपयांचे आकर्षक पर्सनल लोन देण्याची ऑफर असल्याचे सांगून जाळ्यात ओढले. फिर्यादी यांना कोणत्याही कर्जाची आवश्यकता नसतानाही, भामट्याने गोड बोलून त्यांच्याकडून गोपनीय माहिती व प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यावर तब्बल १९ लाख ५३ हजार ७०१ रुपयांचे कर्ज परस्पर मंजूर करून घेतले.
कर्जाची ही मोठी रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यानंतर, आरोपीने १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत फिर्यादी यांच्या संमतीशिवाय व त्यांना कसलीही पूर्वकल्पना न देता विविध अनोळखी बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण १२ लाख ७४ हजार ३३७ रुपये ट्रान्सफर करून काढून घेतले. बँक खात्यातून परस्पर मोठी रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांना आपली सायबर फसवणूक झाल्याचे समजले.
फिर्यादी यांनी त्वरित मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून मुरुड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे करीत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या अशा लोन ऑफर्स किंवा आमिषांना बळी पडू नये आणि बँक खात्याशी संबंधित ओटीपी किंवा गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment