लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
म्हसळ्यात दोघांना अटक; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
म्हसळा-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून आणि जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित अल्पवयीन मुलीशी आरोपी क्रमांक एक याने ओळख वाढवून तिच्याशी मैत्रीचा बहाणा केला होता. फिर्यादी मुलगी अल्पवयीन आहे याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपीने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले आणि तिच्यावर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केले.
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपी क्रमांक दोन यानेही पीडित मुलीच्या अंगावर वाईट इराद्याने हात फिरवून तिचा विनयभंग केला तसेच लैंगिक अत्याचार करत आरोपी क्रमांक एक याला या संपूर्ण दुष्कृत्यासाठी अपप्रेरणा दिली. पीडित मुलीने या अत्याचाराविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली व आरोपींना ताब्यात घेतले.
या संपूर्ण घटनेबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२५/२०२६ नुसार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८, १०, १२, १७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२), ६५(१) आणि ७४ अन्वये दोन्ही आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

Comments
Post a Comment