मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

कुंडलीका नदीतील राफ्टिंग अपघातात मुंबईतील पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू!

राफ्टिंग गाईड व जीवरक्षकावर कोलाड पोलिसांत गुन्हा दाखल


रोहा-रायगड, दि. ११ (प्रतिनिधी) :- ​रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धगडवाडी गावच्या परिसरात कुंडलीका नदीपात्रात थरारक राफ्टिंगदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली असून मुंबईतील एका २६ वर्षीय पर्यटकाचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला आहे. मनोज अमरसिंग नाथ (वय २६, रा. उदयनगर, रूम नं. ६, विक्रोळी वेस्ट, मुंबई) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. ही घटना ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास घडली. मयत मनोज नाथ हे इतर पर्यटकांसोबत राफ्टिंग बोटीत बसून कुंडलिकेच्या खळाळत्या पाण्यात राफ्टिंगचा आनंद घेत असताना, अचानक त्यांची राफ्टिंग बोट पाण्यातील एका झाडाला अडकली आणि जोरदार प्रवाहामुळे उलटली. बोट कलांडल्याने मयत मनोज हे थेट पाण्यात फेकले गेले, मात्र दुर्दैवाने बोटीची दोरी त्यांच्या पायात घट्ट अडकल्यामुळे त्यांना वेळेत बाहेर पडता आले नाही आणि पाण्यात गुदमरून त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.  

​या दुर्घटनेनंतर कोलाड पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ०८/२०२६, बीएनएस २०२३ च्या कलम १९४ नुसार नोंद करून सखोल चौकशी सुरू करण्यात आली होती. पोलीस चौकशीदरम्यान राफ्टिंग गाईड आणि जीवरक्षक यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा निष्काळजीपणा समोर आला. बोटीवरील गाईड गणपती बच्चनसिंग रावत (वय २८, रा. रॉकहील्स रिसॉर्ट, धगडवाडी, ता. रोहा, मूळ रा. उत्तराखंड) आणि जीवरक्षक राजू रामबहादूर परीयार (वय ४३, रा. रॉकहील्स रिसॉर्ट, धगडवाडी, ता. रोहा, मूळ रा. नेपाळ) यांनी मयत पर्यटकाला वाचवण्यासाठी कमालीची हलगर्जी व निष्काळजीपणा दाखवल्याचे तपासात निष्पन्न झाले. या निष्काळजीपणामुळेच पर्यटकाचा नाहक बळी गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चेतन जनार्दन कुथे यांच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट २०२६ रोजी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. बी. फार्णे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सूर्यकांत भोजकर करत आहेत.

Comments

Popular posts from this blog