मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खालापूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी!

CEIR पोर्टलच्या मदतीने ३ लाखांचे १८ गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांच्या केले स्वाधीन


​खालापूर-रायगड, दि. २० (विशेष प्रतिनिधी) :- खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात खालापूर पोलिसांना मोठे यश आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल तीन लाख रुपये किमतीचे १८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. शोध घेण्यात आलेले हे सर्व मोबाईल नुकतेच त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले असून, गहाळ झालेले फोन पुन्हा हाती मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

​खालापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध कारणांमुळे नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने केंद्र सरकारच्या 'सीईआयआर' (CEIR - Central Equipment Identity Register) आणि 'सीआयएआर' (CIAR) या विशेष पोर्टलचा प्रभावी वापर सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि सततच्या मागावरून पोलिसांनी विविध ठिकाणांहून तब्बल ३ लाख रुपये किमतीचे १८ महागडे मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले.

​शोध घेण्यात आलेले हे मोबाईल तक्रारदारांना परत करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यातील आठवडा भेटीदरम्यान खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) डॉ. विशाल नेहुल यांच्या शुभहस्ते हे सर्व मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळेल अशी आशा सोडून दिलेल्या नागरिकांना जेव्हा स्वतःचा फोन परत मिळाला, तेव्हा त्यांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले.

​आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य आणि तत्पर वापर करून पोलिसांनी नागरिकांना दिलेला हा दिलासा कौतुकास्पद ठरत असून परिसरात खालापूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. मोबाईल गहाळ किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात नोंद करावी आणि सीईआयआर पोर्टलवर माहिती नोंदवून सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog