मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

खालापूरमधील कंपन्यांच्या अरेरावीविरोधात सुधाकर घारे यांनी पुकारलेल्या एल्गाराला स्थानिक बेरोजगार संघटनेचा जाहीर पाठिंबा!

राजेंद्र पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह मैदानात उतरणार


​खालापूर-रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- खालापूर तालुक्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील काही कंपन्यांच्या मनमानी आणि अरेरावी कारभारामुळे स्थानिक सुशिक्षित तरुण-तरुणींवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत असून बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर लढा उभारण्यासाठी ज्येष्ठ नेते श्री. सुधाकर घारे यांनी येत्या ३ तारखेला स्थानिक कारखानदारीच्या विरोधात तीव्र एल्गार पुकारला आहे. या जनआंदोलनाला स्थानिक बेरोजगार संघटना, रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माथाडी संघटक श्री. राजेंद्र हिराजी पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पाठिंबा दिला असून प्रत्यक्ष आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

​खालापूर तालुका हा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित झाला आहे. येथील कारखानदारीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या, प्रकल्प उभे राहिले; मात्र आज त्याच परिसरातील स्थानिक सुशिक्षित तरुण आणि तरुणींना नोकऱ्यांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अनेक कंपन्यांचे व्यवस्थापन स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांना अथवा बाहेरील कामगारांना प्राधान्य देत असून, स्थानिकांची अडवणूक करत अरेरावीची भाषा वापरत आहे. स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार न मिळाल्यामुळे तालुक्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या सर्व गंभीर परिस्थितीची दखल घेत श्री. सुधाकर घारे यांनी स्थानिक कारखानदारीच्या अरेरावी विरोधात आणि भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी ३ तारखेला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची घोषणा होताच तालुक्यातील विविध संघटना, कामगार वर्ग आणि बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत.

​याच पार्श्वभूमीवर स्थानिक बेरोजगार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष व माथाडी कामगार संघटक श्री. राजेंद्र हिराजी पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आणि कामगारांचे हक्क हे आमच्या संघटनेच्या केंद्रस्थानी असून, खालापूरमधील कंपन्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राजेंद्र पाटील यांनी दिला आहे. सुधाकर घारे यांनी घेतलेली भूमिका ही सर्वसामान्य भूमिपुत्रांच्या हिताची असल्याने संघटना आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह या आंदोलनात पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​३ तारखेला होणाऱ्या या एल्गार आंदोलनामुळे खालापूर तालुक्यातील कंपनी प्रशासनाचे आणि स्थानिक यंत्रणेचे धाबे दणाणले असून, स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के प्राधान्य आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्व संघटनांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog