कर्जत तालुक्यात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल!
तीन जणांना पोलिसांकडून बेड्या
मांस व हत्यारे जप्त
कर्जत-रायगड, दि. २९ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पोटलवाडी (पो. गौळवाडी) हद्दीत गोवंशीय जनावराची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी कर्जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा संशयितांना अटक केली आहे. आरोपींकडून गोवंशीय मांस आणि जनावराची कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेली धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोटलवाडी परिसरात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:४४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी पोटलवाडी येथील तीन इसम गोवंशीय जनावराची कत्तल करून त्याचे मांस व ते कापण्यासाठी लागणाऱ्या धारदार हत्यारांसह रंगेहाथ मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून मांस व सर्व साहित्य जप्त केले.
या कारवाईनंतर पोलिसांनी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:०२ वाजेच्या सुमारास ताब्यात घेत रीतसर अटक केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२६ नुसार गोवंश हत्या बंदी अधिनियम कलम ५, ९, ५(क), ९(अ) सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक नवले करत आहेत.

Comments
Post a Comment