को. ए. सो. माध्यमिक शाळा नेहुली-खंडाळाच्या २००२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या वर्गमित्रांनी जागविल्या शालेय आठवणी
अलिबाग-रायगड, दि. १६ (प्रतिनिधी) :- आयुष्याच्या धावपळीत प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात व्यस्त झाला, संसाराच्या व नोकरी-व्यवसायाच्या जबाबदाऱ्या वाढल्या, तरीही शालेय जीवनातील निखळ मैत्रीचे बंध आजही तितकेच घट्ट आणि जिवंत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या (को. ए. सो.) नेहुली-खंडाळा येथील माध्यमिक शाळेतील सन २००२ च्या इयत्ता १० वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ‘गेट टुगेदर’ अंतर्गत चौथ्या वार्षिक स्नेहमेळाव्याचे नुकतेच अलिबाग तालुक्यातील पोयनाड-श्रीगाव येथील हिरकणी व्हिला येथे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
सन २००२ मध्ये या शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च व महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या बॅचमधील माजी विद्यार्थी आज वर्ग १ (Class I) आणि वर्ग २ (Class II) यांसारख्या उच्च शासकीय पदांवर तसेच पोलीस दल, भारतीय सैन्य दल (सैनिक), अभियांत्रिकी (इंजिनिअर), सनदी लेखापाल (सीए), वैद्यकीय सेवा (डॉक्टर व नर्स), वकील, शिक्षक, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एम. आर.), व्यावसायिक, शेतकरी, राजकारण, मनोरंजन-कला क्षेत्र (मेकअप आर्टिस्ट, डान्सर, रील्स स्टार) अशा विविध जबाबदार पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. दैनंदिन जीवनातील व्यस्तता आणि वाढत्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही, वर्षभरातून किमान एक दिवस आपल्या जुन्या वर्गमित्रांसाठी राखून ठेवायचा, या दृढ संकल्पातून ही सर्व मित्रमंडळी एकत्र आली होती.
या माजी विद्यार्थ्यांच्या निरंतर संपर्कासाठी ८ जुलै २०१५ रोजी व्हॉट्सॲप ग्रुपची स्थापना करण्यात आली होती. या उपक्रमाला आता ११ वर्षे पूर्ण झाली असून त्या डिजिटल संपर्काचे रूपांतर प्रत्यक्ष भेटीगाठी आणि सामाजिक बांधिलकीत झाले आहे. या मेळाव्याच्या दिवशी सकाळी सर्व माजी विद्यार्थी प्रथम शाळेच्या आवारात एकत्र जमले आणि तेथून हिरकणी व्हिला येथे रवाना झाले. तेथे सर्वांचे टी-शर्ट व नाश्ता देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजित परिसंवाद आणि हितगुज सत्रात सर्व मित्रांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणी, शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन, वर्गातील गमतीजमती आणि बालपणीच्या रंजक किश्श्यांना उजाळा दिला. एकमेकांच्या करिअरमधील अनुभव आणि सल्ले जाणून घेत स्नेहबंध अधिक दृढ केले.
दुपारच्या स्नेहभोजनानंतर सर्वांसाठी विविध मनोरंजक खेळ व खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. विशेष म्हणजे, ‘गेट टुगेदर २००२’ हा उपक्रम केवळ एका दिवसाच्या करमणुकीपुरता मर्यादित न राहता, या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वर्षभर विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व निभावले जाते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांना आठवण म्हणून विशेष भेटवस्तू देऊन या संस्मरणीय सोहळ्याची सांगता करण्यात आली. जुन्या मित्रांच्या या अनोख्या मेळाव्यामुळे पुन्हा एकदा शालेय दिवसांचा आनंद अनुभवता आल्याची भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.


Comments
Post a Comment