मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨


बनावट नोटांद्वारे पालीतील व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पेणच्या इसमाला अटक!

 ५०० च्या ४१ बनावट नोटा जप्त 


​पाली-रायगड, दि. २५ (प्रतिनिधी) :- पाली बाजारपेठेत बनावट नोटांचा वापर करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला पाली पोलिसांनी तत्परतेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे पाली शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मौजे पाली बाजारपेठेमधील हटाळेर नाका परिसरातील चौधरी दूध डेअरी व निखिल चायनीज कॉर्नर या दुकानांच्या मधून हटाळेर नाका ते भोई आळी नाका जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना उघडकीस आली. मूळचा दादर (ता. पेण) येथील रहिवासी असलेला व सध्या पेण येथील फणसडोंगरी, गोळीबार मैदान परिसरात राहणाऱ्या एका इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्याकडील नोटा बनावट असल्याचे माहीत असतानाही त्या खऱ्या भारतीय चलनी नोटा असल्याचे भासवून चलनात आणल्या. या बनावट नोटांद्वारे त्याने पाली बाजारपेठेतील विविध दुकानांमधील व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून त्यांची फसवणूक केली.

​संशयित हालचालींच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित इसमाला ताब्यात घेतले असता, त्याच्या अंगझडतीत व कब्जात ५०० रुपये दराच्या तब्बल ४१ बनावट भारतीय चलनी नोटा मिळून आल्या. यानंतर पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास अटक केली. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १७९ आणि १८० अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बनावट नोटा आरोपीने कुठून आणल्या होत्या आणि यामागे आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का, या दिशेने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कसून तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog