मोक्कातील फरार गुन्हेगारासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून बेड्या!
सिनेस्टाईल पाठलाग करून दोन गावठी कट्टे व काडतुसांसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर, दि. २६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तब्बल सहा गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. चांदबिबी महाल परिसरात गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी हे तिघे आले असता पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल असा एकूण २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची तस्करी व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक नजर ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके कार्यरत करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पाथर्डी तालुक्यातील सराईत गुन्हेगार लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार हा आपल्या दोन साथीदारांसह चांदबिबी महालाजवळ, अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील सर्कल परिसरात गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी एका विना क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलजवळ तीन संशयित थांबलेले दिसले. संशय बळावल्याने पोलीस पथकाने त्यांच्या दिशेने कूच करताच, पोलिसांची चाहूल लागून त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने व सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांनाही जागीच ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ताब्यात घेतलेल्यांची नावे लक्ष्मण उर्फ लखन बाबासाहेब कासार (वय २९, रा. कासारवाडी, ता. पाथर्डी), सचिन राजेंद्र खाडे (वय ३०, रा. अमानवस्ती, तीनखडी, ता. पाथर्डी) आणि अनिकेत दिलीप पटारे (वय २२, रा. धामोरी, ता. नेवासा) अशी निष्पन्न झाली. पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल हँडसेट आणि पल्सर मोटारसायकल असा २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, मुख्य आरोपी लक्ष्मण कासार याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी केली असता तो अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असल्याचे उघड झाले. उपविभागीय दंडाधिकारी, पाथर्डी यांनी १० जानेवारी २०२५ रोजी त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश दिले होते. मात्र, हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो पुन्हा जिल्ह्यात येऊन अवैध शस्त्रांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. लक्ष्मण कासार याच्यावर यापूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, मारहाण यासह मोक्का कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल असून तो अनेक गुन्ह्यांत फरार होता. तसेच त्याचा साथीदार सचिन खाडे याच्यावरही खुनाचा प्रयत्न व शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांच्या अभिलेखात आहे.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र कायदा कलम ३/२५, ७ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मुद्देमालासह नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, सागर ससाणे, प्रशांत राठोड आणि महादेव भांड यांच्या पथकाने पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे अवैध शस्त्र तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Post a Comment