मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

पैसे मागितल्याच्या रागातून तरूणाला बेदम मारहाण!

‘तुझी बायको मला दे, ३० हजार देतो’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपीविरुद्ध तळा पोलिसांत गुन्हा दाखल


तळा-रायगड, दि. १८ (प्रतिनिधी) :- उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी तसेच छत्रीच्या दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) नवीन भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास मौजे बार्पे गावाच्या पाण्याच्या टाकीजवळून रानात जाणाऱ्या वाटेवर घडली. बार्पे (पो. महागाव, ता. तळा) येथील रहिवासी असलेले फिर्यादी हे गावाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीपासून रानामध्ये जात होते. त्याच वेळी त्या ठिकाणी आरोपी आला. फिर्यादीने आरोपीला पाहिले असता, त्यांनी त्याला पूर्वी दिलेले उसने पैसे परत कधी करणार, अशी विचारणा केली. पैसे परत मागताच आरोपीचा पारा चढला आणि त्याने 'मी तुझे पैसे देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर, तुम्ही लोक माझे काही करू शकत नाही' असे म्हणत फिर्यादीला धमकावण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीला 'तुला एका रात्रीत गायब करेन' अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि अत्यंत संतापजनक व आक्षेपार्ह वक्तव्य करत 'तुझी बायको मला दे, मी तुला ३०,००० रुपये देतो' असे उद्गार काढले.

​आरोपीच्या या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या फिर्यादीने तात्काळ आरोपीच्या कानाखाली थापड मारली. याचा राग अनावर झाल्याने आरोपीने त्याच्याजवळ असलेली लहान आकाराची छत्री फिर्यादीच्या खांद्यावर जोरात मारली. जोरदार प्रहारामुळे ती छत्री तिथेच तुटली आणि छत्रीचा फक्त दांडा आरोपीच्या हातात राहिला. त्यानंतर आरोपीने त्याच तुटलेल्या छत्रीच्या दांड्याने फिर्यादीच्या डोक्यावर, छातीवर आणि डोळ्याच्या भुवईवर सपासप वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच त्यानंतरही आरोपीने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

​या घटनेनंतर पीडित फिर्यादीने तळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. फिर्यादीच्या तक्रारीवरून तळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०/२०२६ नुसार, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३(२)(va), तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११५(२), ११८(१), आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून, या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास माणगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शशिकांत पवार हे स्वतः करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog