मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १२ बांगलादेशी घुसखोरांना हुसकावले! पोलीय अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव 🚨

सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला शिराळ्यातून पाठींबा!

 तहसीलदारांना निवेदन 


​शिराळा-सांगली, दि. १६ (प्रतिनिधी) :- लेह-लडाखचे महान पर्यावरणवादी, आदर्श शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १८ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. लेह-लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षण मिळावे, स्थानिकांच्या जमीन व रोजगार हक्कांचे रक्षण व्हावे आणि तेथील संवेदनशील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. याचसोबत, 'नीट' (NEET) पेपरफुटी परीक्षा घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशीही मागणी या आंदोलनाद्वारे लावून धरण्यात आली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी शिराळा येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

​सध्या १८ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची शारीरिक परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून, त्यांच्या प्रकृतीत कमालीचा बिघाड झाला आहे. मात्र, केंद्र सरकार या आंदोलनाबाबत कमालीचे असंवेदनशील असून, आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी हे आंदोलन कसे उधळून लावता येईल, याचाच सातत्याने प्रयत्न करत आहे. नीट पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणातही बेजबाबदार शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत आणि पंतप्रधानही या संवैधानिक आंदोलनाला गांभीर्याने घेत नाहीत, ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत मारक व खेदजनक आहे. केंद्र सरकारच्या या असंविधानिक, असंवेदनशील आणि हुकूमशाही धोरणाचा जाहीर निषेध करत, केंद्र शासनाने बेजबाबदार शिक्षणमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व भविष्यात जनमानसात होणारा उद्रेक थांबवावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

​हे निवेदन तालुकाध्यक्ष धनाजी तुपारे यांनी शिराळ्याच्या तहसीलदारांना सुपूर्द केले. निवेदन देतेवेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे (भाऊ), जिल्हाध्यक्ष विनोद आढाव, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष शुभम कांबळे, शिराळे खुर्द शाखा अध्यक्ष अमर सातपुते, तसेच रत्नदीप सातपुते, हर्षवर्धन सातपुते आणि भारत शिवमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog