संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलीस सज्ज!
चोख बंदोबस्त आणि कडक सुरक्षा उपाययोजना
सराईत गुन्हेगार तडीपार आणि अतिरिक्त कुमक तैनात
सातारा, दि. १४ (प्रतिनिधी) :- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखीचे दिनांक १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात भव्य आगमन होत आहे. हा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात पूर्णपणे निर्विघ्न, सुरक्षित तसेच शांततेत पार पडावा आणि दूरवरून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण भासू नये, यासाठी सातारा पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख आणि कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. माऊलींची पालखी दिनांक १५ ते १८ जुलै दरम्यान सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल आणि त्यानंतर ती सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे. या संपूर्ण चार दिवसांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि समाजकंटकांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांनी आधीपासूनच प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, सोहळ्यात अडथळा ठरू शकणाऱ्या २४ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे, तर आणखी १६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव सध्या प्रशासनाच्या विचाराधीन असून त्यावरही लवकरच कडक कारवाई केली जाणार आहे. पालखी मार्गावर, भाविकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि गर्दीच्या भागात चोऱ्यामाऱ्या रोखण्यासाठी तसेच विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस आणि डी.बी. पथके २४ तास तैनात असणार आहेत.
या भव्य सोहळ्याची संवेदनशीलता आणि अथांग गर्दी लक्षात घेऊन सातारा जिल्हा पोलीस दलाने आपला मोठा फौजफाटा मैदानात उतरवला असून, यामध्ये पोलीस उपअधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस अंमलदार, ९७ महिला पोलीस अंमलदार, ११०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड आणि वाहतूक नियंत्रणासाठी ७५ ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आर.सी.पी.च्या २ प्लाटून आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे (BDDS) १ पथक तैनात ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्याची अथांग भव्यता पाहता स्थानिक पोलिसांच्या सोबतीला जिल्ह्याबाहेरूनही अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून, यामध्ये बाहेरील १८ वरिष्ठ अधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातील १४० अंमलदार, सांगली जिल्ह्यातील १४० अंमलदार, रायगड जिल्ह्यातील १० अंमलदार, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त ३० ट्रॅफिक अंमलदार आणि एस.आर.पी.एफ.ची एक तुकडी सातारा पोलिसांच्या मदतीला दाखल झाली आहे.
सदर संपूर्ण पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या थेट नियंत्रणात व देखरेखीखाली केले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्तात तैनात असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांना अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत, ज्यामध्ये पालखी सोहळ्याच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्यामाऱ्या व पाकीटमारी करणाऱ्यांवर विशेष व बारीक नजर ठेवणे, महिलांची छेडछाड किंवा गैरवर्तन करणाऱ्या नराधमांविरुद्ध तत्काळ कठोर कायदेशीर पावले उचलणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी वेडीवाकडी व बेजबाबदारपणे वाहने चालवून वारकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होत असताना, पालखी सोहळ्यात मिळून येणारे संशयित आणि समाजकंटक यांच्यावर कायद्याचा कडक बडगा उगारला जाईल व त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सातारा पोलीस वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून, नागरिकांनी व भाविकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा वस्तू दिसल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, तसेच हा पालखी सोहळा भक्तीमय वातावरणात, आनंदात आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.


Comments
Post a Comment