रायगड सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘म्युल खाती’ उघडून सायबर गुन्हे करणाऱ्या आरोपींवर ५ गुन्हे दाखल
पेण-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- बँक खात्यांचा गैरवापर करून सायबर गुन्ह्यांना खतपाणी घालणाऱ्यांविरुद्ध रायगडच्या सायबर पोलीस ठाण्याने मोठी आणि धडक कारवाई केली आहे. मौजे पेण आणि परिसरातील खरबाची वाडी, कामार्ली येथील आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खोटी व संशयास्पद बँक खाती उघडून त्यांचा वापर 'म्युल अकाउंट' (Mule Accounts) म्हणून सायबर गुन्ह्यांसाठी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ५ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत दि. ४ फेब्रुवारी २०२६ ते ३० जून २०२६ दरम्यान आरोपी क्रमांक १ व २ यांनी पेण येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खाते उघडून त्याचा वापर सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी केला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०६/२०२६ द्वारे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
तशाच प्रकारच्या दुसऱ्या घटनेत दि. ८ सप्टेंबर २०२५ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपींनी बँक खात्याचा गैरवापर करून म्युल खाते तयार केले आणि सायबर गुन्हे करण्यात हातभार लावला. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०७/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या घटनेत पेण तालुक्यातील खरबाची वाडी, कामार्ली येथील रहिवासी असलेल्या आरोपी क्रमांक १ व २ यांनी बँक ऑफ महाराष्ट्र येथे खाती उघडून सायबर गुन्हेगारांना आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी ती म्युल खाती म्हणून वापरू दिली. यातील तिसरी घटना दि. १५ ऑगस्ट २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली असून त्याबाबत गुन्हा नोंद क्रमांक ०८/२०२६ दाखल आहे, तर चौथी घटना दि. १४ ऑगस्ट २०२५ ते ११ मार्च २०२६ दरम्यान घडली असून त्याबाबत गुन्हा नोंद क्रमांक ०९/२०२६ नोंदवण्यात आला आहे.
तसेच पाचव्या घटनेत दि. १७ सप्टेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडलेल्या खात्याचा वापर सायबर गुन्ह्यातील बेकायदेशीर पैशांच्या देवाणघेवाणीसाठी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या सर्व पाचही गुन्ह्यांमध्ये आरोपींवर भारतीय न्याय संहिता ३१८(४), ३१७(५), ६१(२), ४९ आणि ३(५) या गंभीर कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांचा पुढील अधिक व सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव हे करत आहेत. सायबर पोलीस या म्युल खात्यांच्या माध्यमातून किती रकमेचा अपहार झाला आहे आणि यामागे आणखी कोणाचा हात आहे, याचा कसून शोध घेत आहेत.

Comments
Post a Comment