रायगड जिल्ह्यात 'म्युल' बँक खात्यांद्वारे कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीचे रॅकेट उघडकीस!
कर्जत, पेण आणि पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून मिळालेली रॅकम बेकायदेशीर 'म्युल' (Mule) बँक खात्यांमध्ये वळवून सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कर्जत, पेण आणि पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत निष्पाप नागरिकांच्या नावावर किंवा संगनमताने उघडलेल्या बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीचे पैसे फिरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी आपसात संगनमत करून आणि फौजदारी पात्र कट रचून सायबर गुन्हेगारांकडून प्राप्त होणारी बेकायदेशीर रक्कम स्वतःच्या व इतर खात्यांवर वळती केली असून त्या बदल्यात स्वतःचा अवाजवी आर्थिक फायदा करून घेण्यासाठी बेकायदेशीरपणे जादा कमिशन स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील पहिल्या घटनेत कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मार्च २०२४ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा गैरवापर करून सायबर गुन्ह्यांतील पैसे वळवण्यात आले. याप्रकरणी द मिस्ट, डी विंग, दहिवली, कर्जत येथील आरोपी क्रमांक एक आणि धनकवडी, कात्रज रोड, पुणे येथील आरोपी क्रमांक दोन यांनी संगनमत करून हे खाते उघडले होते. वेगवेगळ्या राज्यातील निष्पाप नागरिकांकडून फसवणुकीद्वारे अपहरित केलेली रक्कम या खात्यात मागवून ती इतर ठिकाणी वळती करण्यात येत होती, ज्याच्या बदल्यात दोन्ही आरोपींनी बेकायदेशीर कमिशन वसूल केले. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३०८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१७(५), ६१(२), ४९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार नागरगोजे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ डिसेंबर २०२५ ते २ फेब्रुवारी २०२६ दरम्यान असाच प्रकार समोर आला आहे. देव आळी, कंवडाळ तलावाजवळ, पेण येथील अर्थ अपार्टमेंटमधील आरोपी क्रमांक एक आणि सरखेल कॉलनी, खडक आळी, पाली सुधागड येथील आरोपी क्रमांक दोन यांनी भागीदारीत व्यवसाय करून सायबर फ्रॉडची रक्कम प्राप्त करण्यासाठी प्लॅन आखला. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडून २०२५ ते २०२६ या काळात सायबर फसवणुकीतून जमा झालेली मोठी रक्कम इतर खात्यांवर हस्तांतरित करण्यास परवानगी देऊन गुन्हेगारांना जाणीवपूर्वक मदत केली. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२), ६१(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार धुपकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तिसऱ्या प्रकरणात पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ फेब्रुवारी २०२४ ते २४ जून २०२६ या प्रदीर्घ कालावधीत आय.डी.बी.आय. बँकेच्या खात्याचा वापर करून असाच सायबर अपराध करण्यात आल्याचे उघड झाले आहे. सुभाषनगर, एस.पी. हाऊस चाळ, पेझारी, पोयनाड येथील आरोपीने कटाकारस्थान रचून आय.डी.बी.आय. बँकेत उघडलेल्या 'म्युल' खात्याचा थेट सायबर गुन्ह्यांमध्ये वापर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ८४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१७(५), ६१(२) आणि ४९ अन्वये गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक सरके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रायगड पोलिसांकडून अशा प्रकारे बँक खात्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक मोहीम हाती घेण्यात आली असून सर्वसामान्यांनी आपल्या बँक खात्यांचे तपशील किंवा खाती कोणालाही भाड्याने अथवा कमिशनवर वापरण्यास देऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment