पोलादपूर येथे माजी सैनिकाचे बंद घर फोडून १२ बोरची बंदूक लंपास!
अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
पोलादपूर-रायगड, दि. ९ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील लोहारेगाव येथे एक धक्कादायक घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्याने एका माजी सैनिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यांची परवानाधारक बंदूक चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारेगाव येथे राहणारे फिर्यादी यांचे वडील हे माजी सैनिक आहेत. त्यांच्याकडे स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी शासनमान्य बंदूक परवाना असून, त्यांनी सन २००३ मध्ये एक नळीची १२ बोर कारतुसी बंदूक खरेदी केली होती. दरम्यान, फिर्यादी यांचे वडील उपचारासाठी आपल्या कुटुंबासह घर बंद करून मुंबई येथे गेले होते. याच संधीचा फायदा उठवून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्याने घराच्या समोरील मुख्य दरवाजाची कडी-कोयंडा शिताफीने तोडून घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेली माजी सैनिकाची परवानाधारक १२ बोरची कारतुसी बंदूक फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरीच्या उद्देशाने चोरून नेली.
कुटुंबीय मुंबईहून परतल्यानंतर हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या चोरीच्या घटनेबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) तसेच भारतीय दंड विधान (IPC) कलम ३८०, ४५४ आणि ४५७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांच्याकडे या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सोपवण्यात आला असून, पोलीस अज्ञात चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

Comments
Post a Comment