खोपोलीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास!
अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल
खोपोली-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- खालापूर तालुक्यातील खोपोली भानवज येथील वर्धमान विहार इमारतीमध्ये घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १,८२,३३१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २२ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेपासून ते २५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, या कालावधीत संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या वर्धमान विहार येथील बंद घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचा लॉक आणि कोयंडा कोणत्यातरी धारदार अथवा दणकट हत्याराने तोडला. त्यानंतर चोरट्याने घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप उघडले. कपाटात ठेवलेले १,८२,३३१ रुपये किमतीचे सोन्याचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून नेली. फिर्यादी घरी परतल्यानंतर ही घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, ज्यानंतर त्यांनी तातडीने खोपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २६२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(a) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा आणि बंद घर लक्ष करून झालेला हा धाडसी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ हे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत असून, घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Comments
Post a Comment