डंपर मालकाला राजकीय पाठबळ?
खरा ड्रायव्हर अद्यापही पोलिसांना का सापडत नाही हा प्रश्न गुलदस्त्यातच!
३२ हजारांचा दंड थकवणाऱ्या डंपर मालकाच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश!
भिसे खिंड अपघात प्रकरण
रोहा-रायगड (विशेष प्रतिनिधी) :- रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत केटीएम मोटरसायकलला झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय निष्पाप तरुण राज गणेश पतंगे याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणात डंपर मालकाला राजकीय पाठबळ लाभल्याची चर्चा रंगली असून, कारवाई होऊ नये यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांना अचानक पुळका आल्याचे समजते. अपघाताला इतके दिवस उलटून गेले तरीही या प्रकरणातील खरा ड्रायव्हर अद्यापही पोलिसांना का सापडत नाही? हा प्रश्न अद्यापभी गुलदस्त्यातच आहे! अपघातग्रस्त टाटा सिग्ना डंपर क्रमांक 'MH06-BW7594' हा असून, विम्याचे लाखो रुपये बेकायदेशीररीत्या लाटण्याचा डंपर मालकाचा गुन्हेगारी कट समोर आला आहे.
कारवाई रोखण्यासाठी नेत्यांना पुळका; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या डंपर मालकाला रोहा आणि रायगडमधील काही बड्या राजकीय नेत्यांचे थेट वरदहस्त असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. अपघात होऊन एका निष्पाप तरुणाचा जीव गेला असताना, दोषींवर कडक कारवाई करण्याऐवजी डंपर मालकाला कायदेशीर कचाट्यातून कसे वाचवता येईल, यासाठी काही बड्या राजकीय नेत्यांना अचानक पुळका आल्याचे समजते. हे नेते पडद्यामागून पोलिसांवर आणि संबंधित यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आता रोहा शहर व तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आहे.
गेला ड्रायव्हर कुणीकडे?
दुसऱ्या बाजूला, गुन्ह्यातील मुख्य दुवा असलेला खरा ड्रायव्हर अद्याप फरारच असून तो पोलिसांना का सापडत नाही? तो कुठे गेला? अदृष्य झाला का? हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे! खऱ्या ड्रायव्हरला अटक झाल्यास डंपर मालकाने खोटा आरोपी (पंकज मिस्त्री) उभा केल्याचा कट न्यायालयात तात्काळ सिद्ध होईल, म्हणूनच राजकीय दबावाचा वापर करून खऱ्या ड्रायव्हरला जाणीवपूर्वक अज्ञात स्थळी लपवून ठेवण्यात आले आहे का, असा थेट संशय आता व्यक्त होत आहे.
विमा चालू होता, पण 'लायसन्स' नसल्यानेच रचला होता बनाव!
उपलब्ध माहितीनुसार, अपघाताच्या वेळी (२० जून २०२६) डंपरचा इन्श्युरन्स चालू होता, कारण त्याची एक्स्पायरी तारीख २४ नोव्हेंबर २०२६ अशी आहे. परंतु, मोटार वाहन कायद्यातील सर्वात कडक तरतुदीनुसार, जर अपघाताच्या वेळी गाडी चालवणाऱ्या खऱ्या चालकाकडे 'जड वाहन चालवण्याचा वैध परवाना' (Heavy Commercial DL) नसेल, तर विमा कंपनी एक रुपयाचाही क्लेम मंजूर करत नाही. विम्याचे लाखो रुपये बुडणार आणि मृत तरुणाच्या कुटुंबाला कोर्टाच्या आदेशाने स्वतःच्या खिशातून अंदाजे ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी लागणार, या भीतीनेच डंपर मालकाने खोटा ड्रायव्हर उभा करण्याचा डाव रचला.
डंपर मालकाने तात्काळ खऱ्या चालकाला फरार केले आणि पंकज मिस्त्री या गरीब तरुणाला "किरकोळ काम आहे" असे आमिष दाखवून, त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत करून त्याला खोटा ड्रायव्हर म्हणून पोलिसांसमोर उभे केले. समोर आलेल्या एका खळबळजनक ऑडिओ क्लिपमध्ये डंपर मालक पंकजला गुमराह करताना स्पष्टपणे म्हणत आहे की, "ही केवळ इन्शुरन्सची साधी केस आहे, आमचा इन्शुरन्सचा वकील सर्व मॅनेज करेल."
३२ हजार रुपयांचा दंड थकवणारा डंपर रस्त्यावर फिरतोच कसा?
या तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या पांढऱ्या रंगाच्या टाटा सिग्ना डंपरवर (Signa 2823.TK) आधीच्या गुन्ह्यांचे आणि नियमांच्या उल्लंघनाचे तब्बल ३० ऑनलाईन चालान प्रलंबित असून, मालकाने ३२,१५० रुपयांचा प्रचंड दंड अद्याप भरलेला नाही. एवढा मोठा शासकीय महसूल थकवून आणि वारंवार वाहतुकीचे नियम पायदळी तुडवूनही हा डंपर धाटाव एमआयडीसीमधून रासायनिक वेस्टची वाहतूक राजरोसपणे करत कसा होता? राजकीय वरदहस्तामुळेच संबंधित यंत्रणा या डंपरकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत होती का? असा संतप्त सवाल आता रायगडमधील जनता विचारत आहे.
अधिकृत पत्ता आणि गुन्हेगारी इतिहासाचा पर्दाफाश
सदर डंपर अधिकृतपणे ज्याच्या नावावर नोंद आहे, त्याचा पिंगळसई येथील पत्ता ऑन-रेकॉर्ड समोर आला आहे. या डंपर मालकाच्या वाहनांचा हा रायगड जिल्ह्यातील तब्बल आठवा अपघात असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी सात अपघातांमध्येही राजकीय वशिला आणि असाच बनाव करून कायदेशीर कारवाई टाळण्यात आली होती का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
डंपरमालकाचा हा महाघोटाळा, राजकीय हस्तक्षेप आणि गुन्हेगारी कट आता पूर्णपणे उघडकीस आला आहे. त्यामुळे केवळ अपघाताची केस न चालवता, डंपर मालकाविरुद्ध पोलिसांची फसवणूक करणे, खोटा आरोपी उभा करणे आणि विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचल्याप्रकरणी स्वतंत्र फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी रायगडमधील सामाजिक संस्था आणि कायदेtज्ज्ञांनी केली आहे. आता राजकीय नेत्यांचा पुळका आणि पोलिसांची सुस्ती बाजूला सारून वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात खऱ्या ड्रायव्हरला अटक करून मृत राज पतंगे याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment