भिसे खिंड अपघात प्रकरणातील डंपरमालकाने ३२ हजारांचा दंड थकवला!
विम्याचा क्लेम लाटण्यासाठी रचलेला कट उघडकीस
रोहा-रायगड (विशेष प्रतिनिधी) :- रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत केटीएम मोटरसायकलला झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय निष्पाप तरुण राज गणेश पतंगे याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणाला आता एका अत्यंत गंभीर आंतरजिल्हा गुन्हेगारी आणि विमा फसवणूक घोटाळ्याचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला पोलीस रेकॉर्डमधील (प्रेसनोट) तांत्रिक चुकीमुळे अपघातग्रस्त वाहनाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता, कारण तो नंबर एका ऑटोरिक्षेचा निघाल्याने खळबळ उडाली होती. परंतु, या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा केल्यावर, त्या अपघातग्रस्त डंपरचा खरा आणि अधिकृत क्रमांक 'MH06BW7594' असा असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे! डंपरचा खरा नंबर समोर आल्याने, विम्याचे लाखो रुपये बेकायदेशीररीत्या लाटण्याचा मालकाचा गुन्हेगारी कट उघड झाला आहे.
विमा चालू होता, पण 'लायसन्स' नसल्यानेच रचला होता खोटा ड्रायव्हर उभा करण्याचा कट!
उपलब्ध माहितीनुसार, अपघाताच्या वेळी (२० जून २०२६) डंपरचा इन्श्युरन्स चालू होता, कारण त्याची एक्स्पायरी तारीख २४ नोव्हेंबर २०२६ अशी आहे. परंतु, खरा अडथळा विमा संपण्याचा नाही, तर मोटार वाहन कायद्यातील सर्वात कडक तरतूद आहे. जर अपघाताच्या वेळी गाडी चालवणाऱ्या खऱ्या चालकाकडे 'जड वाहन चालवण्याचा वैध परवाना' (Heavy Commercial DL) नसेल, तर विमा कंपनी एक रुपयाचाही क्लेम मंजूर करत नाही. विम्याचे लाखो रुपये बुडणार आणि मृत तरुणाच्या कुटुंबाला कोर्टाच्या आदेशाने स्वतःच्या खिशातून अंदाजे ५० लाखापर्यंत भरपाई द्यावी लागणार, या भीतीनेच डंपर मालकाने खोटा ड्रायव्हर उभा करण्याचा डाव रचला.
डंपर मालकाने खऱ्या चालकाला फरार केले आणि पंकज मिस्त्री या गरीब तरुणाला "किरकोळ काम आहे" असे आमिष दाखवून, त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत करून त्याला खोटा ड्रायव्हर म्हणून पोलिसांसमोर उभे केले. समोर आलेल्या एका खळबळजनक ऑडिओ क्लिपमध्ये डंपर मालक पंकजला गुमराह करताना स्पष्टपणे म्हणत आहे की, "ही केवळ इन्शुरन्सची साधी केस आहे, आमचा इन्शुरन्सचा वकील सर्व मॅनेज करेल."
३२ हजार रुपयांचा दंड थकवणारा डंपर रस्त्यावर फिरतोच कसा?
याप्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या पांढऱ्या रंगाच्या टाटा सिग्ना डंपरवर (Signa 2823.TK) आधीच्या गुन्ह्यांचे आणि नियमांच्या उल्लंघनाचे तब्बल ३० ऑनलाईन चालान प्रलंबित असून, डंपर मालकाने ३२,१५० रुपयांचा प्रचंड दंड अद्याप भरलेला नाही. एवढा मोठा शासकीय महसूल थकवून आणि वारंवार वाहतुकीचे नियम पायदळी तुडवूनही हा डंपर धाटाव एमआयडीसीमधून रासायनिक वेस्टची वाहतूक राजरोसपणे करत कसा होता? संबंधित यंत्रणा या डंपरकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत होती का? असा संतप्त सवाल आता रायगडमधील जनता विचारत आहे.
या डंपर मालकाच्या वाहनांचे हा रायगड जिल्ह्यातील तब्बल आठवा अपघात असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी सात अपघातांमध्येही असाच बनाव करून कायदेशीर कारवाई टाळण्यात आली होती का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. डंपरमालकाचा हा महाघोटाळा आणि गुन्हेगारी कट आता पूर्णपणे उघडकीस आला आहे. त्यामुळे केवळ अपघाताची केस न चालवता, डंपर मालकाविरुद्ध पोलिसांची फसवणूक करणे, खोटा आरोपी उभा करणे आणि विमा कंपनीची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचल्याप्रकरणी स्वतंत्र फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करावा, अशी मागणी रायगडमधील सामाजिक संस्था आणि कायदेतज्ज्ञांनी केली आहे.

Comments
Post a Comment