मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

व्यसनमुक्त समाजासाठी ठाणे पोलीस आणि CAWSE फाउंडेशनचा पुढाकार!
कोपरी आणि वागळे परिसरात पथनाट्याद्वारे ‘से नो टू ड्रग्स’चा संदेश


ठाणे, दि. २५ (प्रतिनिधी) :- तरुणाईला लागलेले ड्रग्जचे व्यसन ही आजच्या समाजासमोरील एक गंभीर समस्या बनली असून याविरोधात जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस आणि सामाजिक संस्था आता रस्त्यावर उतरल्या आहेत. व्यसनमुक्ती सप्ताह २०२६ चे औचित्य साधून ठाणे पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स सेल आणि 'CAWSE फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ठाण्यातील कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरात एका धडक जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत कोपरी येथील आनंद सिनेमा परिसर आणि वागळे इस्टेटमधील मुख्य चौकांमध्ये पथनाट्यांचे सादरीकरण करून नागरिकांना व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. 'सुरक्षित शहर, सुरक्षित विद्यार्थी आणि व्यसनमुक्त समाज' हे मुख्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​या विशेष मोहिमेचे नेतृत्व पोलीस उपायुक्त श्री. अमरसिंह जाधव यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी आणि वागळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजातील या घातक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून जनमानसात जागृती निर्माण होणे गरजेचे आहे, हा विचार घेऊन या मोहिमेत तरुणांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेण्यात आले होते. यामध्ये एन.के.टी. (NKT) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी आणि 'CAWSE फाउंडेशन'च्या युवा प्रतिनिधींनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे पथनाट्य सादर करत अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे आणि तरुणांचे भविष्य यावर प्रकाश टाकला.

​पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना आणि प्रामुख्याने तरुण पिढीला "Say No To Drugs" (अंमली पदार्थांना नकार द्या) अशी सामूहिक शपथ देण्यात आली. ड्रग्जच्या विळख्यातून आपल्या परिसराला आणि पर्यायाने शहराला कसे सुरक्षित राखता येईल, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या जनजागृतीची मोठी गरज असल्याचे यावेळी उपस्थित वक्त्यांनी सांगितले. ठाणे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यसनांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था यापुढेही सातत्याने असे उपक्रम राबवणार असून, नागरिकांनीही आपल्या परिसरात अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी यावेळी केले. या यशस्वी अभियानामुळे संपूर्ण ठाणे परिसरात व्यसनमुक्तीच्या चळवळीला एक मोठी गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog