तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर प्रियकराची आत्महत्या; रोह्याचे निडी गाव हादरले!
प्रेमप्रकरणाचा थरार अन दोन कोवळ्या जीवांचा अंत
प्रेमप्रकरणाचा दुर्दैवी शेवट
रोहा, दि. १७ (संदीप सरफळे) :- रोहा तालुक्यातील निडी गावात रविवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरुणीची गळा आवळून निर्घृण हत्या केल्यानंतर, तिच्या प्रियकरानेही स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या भयंकर घटनेमुळे संपूर्ण रोहा परिसर हादरून गेला असून, एका प्रेमप्रकरणाचा अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक शेवट झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निडी येथील रहिवासी लक्ष्मण गाडेकर यांच्या घरी सोमवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आरोपी रोहित पाटील (वय २७) आणि मृत तरुणी तन्वी ताडकर (वय २०) यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. प्रचंड संतापाच्या भरात रोहितने तन्वीला बोलावून घेतले आणि तिला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात रोहितने नायलॉनच्या दोरीने तन्वीचा गळा आवळून तिची हत्या केली. तन्वीचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच, घाबरलेल्या रोहितने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला त्याच नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
एकाच वेळी घडलेल्या या खून आणि आत्महत्येच्या सत्रामुळे निडी गावात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नामदेव मढवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार हा संपूर्ण प्रकार प्रेमप्रकरणातून आणि क्षणिक रागातून घडल्याची माहिती रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास अतिरिक्त कार्यभार असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी शेरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील व त्याचे पथक करीत आहे.
Comments
Post a Comment