रिलायन्सचा जनसंपर्क अधिकारी झाला 'सैराट'
हॉटेलमध्ये येण्याची ऑफर देत महिलेचा विनयभंग!
नागोठणे पोलिसांत गुन्हा दाखल
नागोठणे-रायगड (प्रतिनिधी) :- नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, कामाच्या कंत्राटाची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने 'रिलायन्स' च्या जनसंपर्क अधिकाऱ्याने एका महिला कंत्राटदाराचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेणसे येथील रिलायन्स इस्टेट ऑफिसमध्ये दिनांक ४ जून २०२६ रोजी दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला फिर्यादी यांना रिलायन्स कंपनी बेणसे यांच्याकडून झोतीरपाडा येथील गटार बांधण्याचे कंत्राट मिळाले होते. या १ वर्षाच्या कंत्राटाची मुदत संपल्यामुळे ती मुदत वाढवून घेणे गरजेचे होते. याच कंत्राटाच्या नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आरोपीने महिला फिर्यादी यांना कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यानुसार महिला फिर्यादी या त्यांच्या सासूसोबत रिलायन्स इस्टेट ऑफिसमधील आरोपीच्या केबिनमध्ये गेल्या होत्या.
केबिनमध्ये कंत्राटाच्या मुदतवाढीबाबत चर्चा सुरू असताना, आरोपीने सर्व मर्यादा ओलांडून फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. आरोपीने फिर्यादीला म्हटले की, तुम्ही इथे कशाला आलात, आपण हॉटेलला भेटलो असतो, तिथे मी तुमच्या कंत्राटाची मुदत वाढवून देतो. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादी महिलेचा उजवा हात पकडला आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. कार्यालयासारख्या सार्वजनिक आणि जबाबदार ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला अत्यंत हादरून गेली.
या गंभीर प्रसंगानंतर पीडित महिलेने तात्काळ नागोठणे पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराबाबत रीतसर फिर्याद दिली. महिलेच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १०१/२०२६ नुसार, भारतीय दंड विधान (भा.दं.वि.) कलम ३५४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ७४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार सानप करत आहेत.

Comments
Post a Comment