नागोठणे पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई!
चेराठी व काळकाई जंगलातील छाप्यांत सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त
नागोठणे, दि. २० (महेंद्र माने) :- स्थानिक पोलिसांनी अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू ठेवलेले धाडसत्र अधिक तीव्र केले आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व त्यांच्या पथकाने रविवारी १४ जून आणि बुधवारी १७ जून रोजी वाघ्रण वाडी परिसरातील जंगलात जाऊन हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत अनुक्रमे २२,००० आणि ९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा धडाका कायम ठेवत पोलिसांनी शुक्रवारी, १९ जून रोजी चेराठी व काळकाई येथील जंगलात तब्बल २५ किलोमीटर आत जाऊन आणखी एक मोठी यशस्वी कारवाई केली. या ताज्या छाप्यात पोलिसांनी १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.
चेराठी आणि काळकाई जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारूची निर्मिती केली जात असून ती विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस आयुक्त अभिजीत शिवतरे आणि रोहा उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, सहाय्यक फौजदार कृष्णा म्हात्रे, पोलीस हवालदार महेश लांगी व अथर्व पाटील आणि पोलीस शिपाई स्वप्नील भालेराव यांच्या पथकाने जंगलात दुर्गम भागात धाड टाकली.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त करून दारू साठा समूळ नष्ट केला. यात पहिल्या ठिकाणी २० लिटर तयार गावठी दारू आणि १,००० लिटर गूळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ५२,००० रुपये आहे. तर दुसऱ्या ठिकाणी २५ लिटर तयार गावठी दारू आणि १,४०० लिटर गूळमिश्रित रसायन जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ७२,००० रुपये आहे. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणांहून एकूण १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०९/२६ आणि ११०/२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (इ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस करत आहेत.


Comments
Post a Comment