खोट्या पोलीस इन्स्पेक्टरने मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून महिलेला लुटले!
महाडमध्ये लाखो रूपयांची फसवणूक
महाड-रायगड, दि. २६ (प्रतिनिधी) :- पोलीस असल्याचे सांगून आणि मंत्रालयात मोठी ओळख असल्याचा बनाव रचून एका भामट्याने महिलेची आणि तिच्या मैत्रिणीची तब्बल ७ लाख ४ हजार ३०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना महाड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, फेड बँक, नवेनगर, महाड येथे ही फसवणुकीची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी हा न्यू पनवेल येथील खांदा कॉलनी, सेक्टर-८, अश्वमेध अपार्टमेंट, फ्लॉट नंबर १८ चा रहिवासी आहे. आरोपीने महिला फिर्यादी आणि तिच्या साक्षीदार मैत्रिणीशी संपर्क साधून, आपण आणि आपली पत्नी पोलीस इन्स्पेक्टर आहोत आणि सध्या मुंबईतील मंत्रालयात कार्यरत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या मैत्रिणीची जुन्या भारतीय चलनातील पैशांच्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक झाली होती. आरोपीने या जुन्या प्रकरणाचा फायदा उठवण्याचे ठरवले. त्याने फिर्यादीला विश्वासात घेऊन सांगितले की, तो पोलीस अधिकारी असल्याने आणि मंत्रालयातील प्रभावाचा वापर करून तिची फसवणूक झालेली सर्व रक्कम परत मिळवून देईल. या बदल्यात कायदेशीर प्रक्रिया आणि इतर खर्चासाठी त्याने ७ मार्च २०२६ रोजी फिर्यादीकडून ६०,००० रुपये रोख रक्कम घेतली.
तितक्यावरच न थांबता, आरोपीने पुढील आर्थिक लाभासाठी पुन्हा एक नवा डाव टाकला. त्याने २७ आणि २८ मे २०२६ रोजी फिर्यादीला महाड येथील नवेनगर भागातील फेड बँकेत बोलावून घेतले. तिथे त्याने फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याचे मंगळसूत्र (काळ्या मण्यांसह) स्वतःच्या ताब्यात घेतले. फिर्यादीचा पूर्ण विश्वास असल्याने तिनेही दागिने त्याच्या स्वाधीन केले. आरोपीने हे दोन्ही मंगळसूत्र बँकेत स्वतःच्या नावावर तारण ठेवून त्यावर लोन (कर्ज) मंजूर करून घेतले. बँकेने या सोन्यावर ६ लाख ४४ हजार ३०० रुपयांचे कर्ज मंजूर केले, जी रक्कम आरोपीने चलाखीने फिर्यादीला न देता थेट स्वतःच्या बँक खात्यावर वर्ग करून घेतली.
अशा प्रकारे आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीला पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने तारण ठेवून एकूण ७,०४,३०० रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून महाड शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८५/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), आणि ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर फसवणूक प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते हे करीत आहेत.

Comments
Post a Comment