मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

पेण जवळील बोरगाव रोडवर शेतकऱ्यावर दोन अज्ञात इसमांकडून लाठीने प्राणघातक हल्ला!
सीसीटीव्ही तपासात आरोपींची ओळख पटली; रावे गावातील बड्या नेत्याच्या पुतण्यांचा समावेश असल्याचा संशय


पेण-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- पेण तालुक्यातील दिव येथील एका वृद्ध शेतकऱ्यावर दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकल आडवी मारून बांबूच्या काठीने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, खांद्याला आणि हाताच्या पंजाला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

​घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी हरेश्वर भालचंद्र ठाकूर (वय ५६ वर्षे, व्यवसाय- शेती, रा. दिव, पो. वाशी, ता. पेण, जि. रायगड) हे आपल्या कुटुंबासह दिव येथे राहतात आणि त्यांची बोरगाव येथे माळरान जमीन आहे. नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कामे पाहण्यासाठी ते गुरुवारी, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या दिव येथील घरून मोटारसायकल घेऊन बोरगाव येथील माळरानाकडे जाण्यास निघाले होते. सुमारे १ वाजून ४० मिनीटांच्या सुमारास ते बोरगाव रोडवरील नदीच्या पुढील रस्त्यावरून जात असताना, त्यांना रस्त्यात एक नंबर प्लेट नसलेली अवेंजर मोटारसायकल उभी असलेली दिसली. त्या मोटारसायकलवर दोन अज्ञात इसम बसलेले होते, ज्यांच्या हातात बांबूची काठी होती आणि त्यातील एकाने ओळख पटू नये म्हणून आपल्या चेहऱ्याला रुमाल बांधलेला होता.

​फिर्यादी हरेश्वर ठाकूर हे त्यांच्या बाजूने आपली मोटारसायकल घेऊन पुढे निघून जात असतानाच, सूर्यकांत म्हात्रे यांच्या घराजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या त्या दोन्ही अज्ञात इसमांनी आपली अवेंजर मोटारसायकल ठाकूर यांच्या मोटारसायकलला घासून जोरात आडवी मारली. या अचानक झालेल्या धडकेमुळे हरेश्वर ठाकूर हे मोटारसायकलसह रस्त्यावर खाली कोसळले. ते खाली पडताच मोटारसायकलवरील दोघेही खाली उतरले आणि काही एक न बोलता त्यांनी ठाकूर यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एका अज्ञात इसमाने ठाकूर यांच्या थेट कानाखाली मारली, तर दुसऱ्या इसमाने त्याच्या हातातील बांबूच्या जड काठीने ठाकूर यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर आणि डोक्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की ठाकूर यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि वार अडवण्यासाठी आपले हात पुढे केले असता, त्यांच्या हाताच्या पंजालाही गंभीर दुखापत झाली.

​या अचानक झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या हरेश्वर ठाकूर यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरात राहणारे सूर्यकांत म्हात्रे आणि त्यांची पत्नी तातडीने आपल्या घरातून बाहेर धावून आले. म्हात्रे दाम्पत्य मदतीसाठी धावून आल्याचे पाहताच हल्लेखोरांचे धाबे दणाणले. सूर्यकांत म्हात्रे यांनी प्रसंगावधान राखत पुढे होऊन एका हल्लेखोराच्या हातातील बांबूची काठी हिसकावून घेतली. लोकांनी आपल्याला पकडू नये या भीतीने दोन्ही अज्ञात हल्लेखोर ती बांबूची काठी घटनास्थळीच टाकून, आपल्या नंबर प्लेट नसलेल्या अवेंजर मोटारसायकलवर बसून पेण शहराच्या बाजूने वेगाने पळून गेले.

​या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या हरेश्वर ठाकूर यांनी पेण पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसून तपास सुरू केला असता, पेण पोलिसांना सदर संशयास्पद अवेंजर गाडी रावे गावाच्या दिशेने जाताना स्पष्टपणे दिसली. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून संबंधित आरोपींची ओळख पटवून घेतली असून, हे आरोपी रावे गावातीलच रहिवासी असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर आरोपी हे रावे गावातील एका बड्या राजकीय नेत्याचे पुतणे असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

​या संपूर्ण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फिर्यादी हरेश्वर ठाकूर यांनी पोलिसांकडे एक मोठा संशय व्यक्त केला आहे. ठाकूर यांच्या बोरगाव येथील जमिनीच्या बाजूला असलेल्या जागेवरून गेल्या काही काळापासून वाद सुरू असून, याच जमिनीच्या वादातून आपल्याला जीवे मारण्यासाठी किंवा धडा शिकवण्यासाठी ही सुपारी देऊन हा पूर्वनियोजित हल्ला घडवून आणला गेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे आणि त्यात बड्या राजकीय नेत्याच्या नातेवाईकांचे नाव समोर आल्यामुळे बोरगाव, रावे आणि पेण परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस या जमिनीच्या वादाचा आणि सुपारीच्या कोनाचा सर्व बाजूने सखोल तपास करत असून, राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस आरोपींना कधी अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

Comments

Popular posts from this blog