मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

भिसे खिंडीतील अपघात प्रकरणाला खळबळजनक वळण!
अपघातापूर्वी 'सुदर्शन' कंपनीतून रासायनिक वेस्ट घेऊन निघाला होता डंपर
डंपरच्या स्टिअरिंगवर पंकज मिस्त्री हा नव्हताच; तर दुसराच एक चालक होता
 सीसीटीव्ही तपासाची मागणी 


​रोहा-रायगड, दि. २८ (विशेष प्रतिनिधी) :- रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत केटीएम मोटरसायकलला झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय निष्पाप तरुण राज गणेश पतंगे याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणाला आता एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात रोहा पोलीस ठाण्यात डंपर चालक म्हणून पंकज अरुण मिस्त्री (वय २९, रा. पाटणसई, ता. रोहा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षातील वस्तुस्थिती आणि त्या रात्री घडलेला घटनाक्रम पूर्णपणे वेगळाच असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप आधीच समोर आली असतानाच आता या डंपरच्या प्रवासाबाबत आणि त्यावरील खऱ्या ड्रायव्हरबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​धाटाव एमआयडीसीमधील 'सुदर्शन' कंपनीचे कनेक्शन; गेटवरील सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्त्वाचे

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, अपघात घडण्यापूर्वी सदर डंपर क्रमांक एमएच-०६/बीव्ही-७५९४ हा अपघाताच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धाटाव एमआयडीसीमधील प्रसिद्ध "सुदर्शन" कंपनीतून ईटीपी (ETP) चा रासायनिक वेस्ट (टाकाऊ) माल घेऊन बाहेर निघाला होता. हा रासायनिक वेस्ट माल नाशिक जिल्ह्यातील नारायणगावच्या दिशेने एका गोडाऊनमध्ये खाली करण्यासाठी जात होता, अशी माहिती आता समोर येत आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की, संध्याकाळी ६ वाजता जेव्हा हा डंपर सुदर्शन कंपनीच्या गेटमधून बाहेर पडला, तेव्हा त्या डंपरच्या स्टिअरिंगवर पंकज मिस्त्री हा नव्हताच, तर दुसराच एक चालक कार्यरत होता. पोलिसांनी जर सुदर्शन कंपनीच्या गेटवरील आणि सुरक्षा विभागाचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तात्काळ ताब्यात घेऊन तपासले, तर डंपर चालवणाऱ्या त्या खऱ्या ड्रायव्हरचा चेहरा आणि ओळख कायदेशीररीत्या स्पष्ट होऊ शकते, ज्यामुळे पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांचे बिंग फुटणार आहे.

​रासायनिक वेस्ट मालाचा खतामध्ये भेसळीसाठी वापर? मोठ्या रॅकेटचा संशय!

या प्रकरणात केवळ अपघातच नाही, तर एक मोठे बेकायदेशीर रॅकेट सक्रिय असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. सुदर्शन कंपनीतून निघणारा ईटीपीचा हा रासायनिक वेस्ट माल शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांमध्ये भेसळ करण्यासाठी रासायनिक माफियांकडून वापरण्यात येतो, अशी अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशा घातक रासायनिक वेस्टची बेकायदेशीर वाहतूक नाशिकच्या दिशेने कोणाच्या सांगण्यावरून केली जात होती आणि यामागे कोणते मोठे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, याचा शोध लागणे आता गरजेचे झाले आहे. यावरून स्पष्ट होते की, अपघात घडल्यानंतर डंपर मालकाने केवळ पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठीच नाही, तर या रासायनिक वेस्टच्या बेकायदेशीर व्यवसायावर पांघरूण घालण्यासाठी आणि इन्शुरन्स लाटण्यासाठी गरीब पंकज मिस्त्री याला "केवळ गाडी सोडवण्याचे किरकोळ काम आहे" असे खोटे सांगून त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स हस्तगत केले आणि खोटा बनाव रचला.

अपघाताच्या वेळी पंकज अन्य ठिकाणी असल्याचा दावा

सध्या पंकज मिस्त्री याच्याकडे डंपर मालकाच्या माणसांसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप हाच मुख्य तांत्रिक पुरावा उपलब्ध असला, तरी अपघाताच्या रात्री आणि त्या संपूर्ण वेळेत पंकज हा अपघात घडलेल्या भिसे खिंडीत उपस्थितच नव्हता, तर तो रोहा तालुक्यातील अन्य परिसरात स्वतःच्या वैयक्तिक कामाच्या निमित्ताने उपस्थित होता, अशी माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, पंकज हा निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी अपघाताच्या वेळी तो ज्या-ज्या ठिकाणी होता, तेथील शासकीय व खाजगी आस्थापनांचे सीसीटीव्ही फुटेज तसेच त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी तपासावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

​ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केल्यास 'फॉरेन्सिक तपासणी' ठरणार कळीचा मुद्दा

या प्रकरणात डंपर मालक किंवा संबंधित व्यक्तींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर ऑडिओ क्लिप बनावट किंवा खोटी असल्याचा आरोप केला, तरी आधुनिक कायदेशीर तंत्रज्ञानासमोर हा दावा टिकणे कठीण आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, जर पोलिसांनी ही ऑडिओ क्लिप 'फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी' (FSL) कडे फॉरेन्सिक व्हाईस ॲनालिसिस आणि स्पेक्ट्रोग्राफी चाचणीसाठी पाठवली, तर दोन्ही व्यक्तींच्या आवाजाचे नमुने घेऊन या संभाषणाची संपूर्ण सत्यता आणि अचूकता वैज्ञानिक पुराव्याद्वारे न्यायालयात सिद्ध होऊ शकते. तसेच संबंधित दूरसंचार कंपनीकडून कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) मागवल्यास त्या दिवशी व त्या वेळी डंपर मालकाच्या माणसांचे आणि पंकज मिस्त्री यांच्यात फोनवर झालेले संभाषण कायदेशीररीत्या ऑन-रेकॉर्ड सिद्ध होईल.

ऑडिओ क्लिप (कॉल रेकॉर्डींग)

समोर आलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमध्ये, फसवणूक करणारी व्यक्ती पंकजला कायदेशीर बाबींविषयी गुमराह करताना ऐकू येत आहे. "ही केवळ इन्शुरन्सची साधी केस आहे, कोर्टात फक्त एक तारीख लागेल, आमचा वकील सर्व सांभाळून घेईल" असे सांगून पंकजचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, पंकजने पोलिसांसमोर किंवा कोर्टात खरी माहिती सांगू नये म्हणून फसवणूक करणारी व्यक्ती "याबाबत पोलिसांना सर्व माहिती आहे, पोलीस आपल्या बाजूने आहेत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीने सर्व गोष्टी अनुकूल केल्या आहेत" असा मोठा दावा करताना दिसत आहे. मात्र, डंपर मालक पोलिसांच्या नावाचा आणि प्रतिमेचा गैरवापर करून पंकजला कायदेशीर भीतीपासून दूर ठेवण्यासाठी खोटे बोलत आहे की यामागे खरोखरच तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे? असा प्रश्न आता या संभाषणावरून उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा

​सध्या रोहा पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणी गुन्हा रजि. नं. १८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होण्याच्या मार्गवर आहे. कायद्यानुसार कलम १०६(१) हा निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत एका निष्पाप व्यक्तीला खोट्या आश्वासनांना बळी पाडून गुन्हेगार ठरवण्याचा आणि खऱ्या गुन्हेगारासह रासायनिक वेस्टच्या रॅकेटला पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न अत्यंत चिंताजनक आहे. आता सुदर्शन कंपनीच्या गेटवरील सीसीटीव्ही फुटेज, खतामधील भेसळीचा संशय आणि ऑडिओ क्लिपचे हे संपूर्ण गंभीर प्रकरण समोर आल्यानंतर, कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय पायक या प्रकरणाचा सखोल व पूरक तपास (Supplementary Investigation) करून खऱ्या दोषींवर आणि या रॅकेटच्या मुख्य सुत्रधारांवर कारवाई करतील का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog