मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

भिसे खिंडीतील अपघात प्रकरणाला मोठे वळण; खऱ्या ड्रायव्हरकडे लायसन्स नसल्यामुळे बनाव रचून खोटा ड्रायव्हर पुढे केला
इन्श्युरन्सचे लाखो रूपये हडप करण्यासाठी भयानक कारस्थान
इन्श्युरन्स कंपनीला पहिल्याच टप्प्यात सावध राहण्याचे आवाहन


रोहा-रायगड, दि. २९ (विशेष प्रतिनिधी) :- रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत केटीएम मोटरसायकलला झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय निष्पाप तरुण राज गणेश पतंगे याच्या दुर्दैवी मृत्यूच्या प्रकरणाला आता एक अत्यंत खळबळजनक आणि कायदेशीररीत्या गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणात रोहा पोलीस ठाण्यात डंपर चालक म्हणून पंकज अरुण मिस्त्री याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षातील वस्तुस्थिती केवळ पोलिसांची दिशाभूल करण्यापुरती मर्यादित नाही. डंपर मालकाकडून इन्श्युरन्सचे (विम्याचे) लाखो रूपये बेकायदेशीररीत्या हडप करण्यासाठी रचलेला हा एक पूर्वनियोजित आर्थिक कट असून, या बातमीच्या माध्यमातून संबंधित इन्श्युरन्स कंपनीलाही (Claims & Investigation Department) तात्काळ सावध करण्यात येत आहे की, त्यांनी या डंपरचा कोणताही क्लेम मंजूर करण्यापूर्वी स्वतः स्वतंत्र चौकशी करावी; अन्यथा खोट्या कागदपत्रांच्या आधारे कंपनीला लाखो रुपयांचा मोठा गंडा घातला जाण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील एक खळबळजनक ऑडिओ क्लिप आधीच समोर आली असून, त्यातील संभाषणावरून या संपूर्ण डावाचा पर्दाफाश झाला आहे.

​ड्रायव्हरकडे लायसन्स नसल्याने डंपर मालकाचे धाबे दणाणले; खोटा ड्रायव्हर उभा करण्याचा मास्टरप्लॅन

मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार, अपघाताच्या रात्री डंपर क्रमांक एमएच-०६/बीव्ही-७५९४ वर जो खरा चालक कार्यरत होता, त्याच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना (Valid Driving License) नव्हता. डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच आणि आपल्या चालकाकडे लायसन्स नसल्याचे लक्षात येताच डंपर मालकाचे कायदेशीर आणि आर्थिक धाबे दणाणले. कारण, मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) जर अपघातग्रस्त वाहनाच्या चालकाकडे लायसन्स नसेल, तर विमा कंपनी अपघाताचा क्लेम (Third Party Insurance Claim) पूर्णपणे फेटाळून लावते. अशा परिस्थितीत अपघातात मृत झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला द्यावी लागणारी अंदाजे ५० लाख रुपयांच्या आसपास असणारी लाखो रुपयांची नुकसानभरपाई आणि स्वतःच्या डंपरच्या नुकसानीचा खर्च हा थेट डंपर मालकाला स्वतःच्या खिशातून द्यावा लागला असता. या प्रचंड आर्थिक दंडापासून आणि कायदेशीर कारवाईपासून स्वतःची कातडी वाचवण्यासाठी डंपर मालकाने तात्काळ खऱ्या ड्रायव्हरला घटनास्थळावरून फरार केले आणि इन्श्युरन्सचे हे लाखो रूपये हडप करण्यासाठी एक नवा खोटा ड्रायव्हर उभा करण्याचा मास्टरप्लॅन आखला.

फसवणूक आणि इन्श्युरन्स क्लेम घोटाळा; इन्श्युरन्स कंपनीच्या अंतर्गत चौकशीची गरज

या संपूर्ण प्रकरणात केवळ पोलिसांची आणि न्यायालयाचीच दिशाभूल केली जात नसून, संबंधित इन्श्युरन्स कंपनीची देखील मोठी आर्थिक फसवणूक करण्याचा हा सुनियोजित प्रयत्न आहे. डंपर मालकाकडून इन्श्युरन्स क्लेम मंजुर करून घेण्यासाठी ज्या 'थर्ड पार्टी इन्श्युरन्स' आणि अपघाती विम्याच्या कायदेशीर प्रक्रियेचा वापर केला जात आहे, ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, हा थेट 'इन्श्युरन्स क्लेम फ्रॉड' (विमा फसवणूक घोटाळा) चा प्रकार आहे. त्यामुळे इन्श्युरन्स कंपनीच्या वरिष्ठ कायदेशीर विभागाला (Legal and Claims Division) विनंती आहे की, पोलिसांनी तयार केलेल्या प्राथमिक कागदपत्रांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी, डंपर मालक आणि कथित चालक पंकज मिस्त्री यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग आणि सुदर्शन कंपनीच्या गेटवरील सीसीटीव्ही फुटेजची स्वतःच्या पातळीवर तांत्रिक पडताळणी करावी, जेणेकरून कंपनीचा लाखो रुपयांचा अपहार टळू शकेल.

इन्श्युरन्सचे पैसे बेकायदेशिरपणे हडप करण्याचा डाव!

या आर्थिक कचाट्यातून सुटण्यासाठी डंपर मालकाने पंकज मिस्त्री या गरीब तरुणाला लक्ष्य केले. "गाडी पोलीस ठाण्यातून सोडवण्याचे केवळ किरकोळ काम आहे, त्यासाठी फक्त तुझे ड्रायव्हिंग लायसन्स दे" असे सांगून पंकजचा विश्वास संपादन केला व त्याचे लायसन्स हस्तगत केले. हेच लायसन्स पोलिसाकडे जमा करून, अपघाताच्या वेळी पंकज मिस्त्री हाच गाडी चालवत होता, असा खोटा बनाव रचण्यात आला. समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये फसवणूक करणारी व्यक्ती पंकजला गुमराह करताना स्पष्टपणे म्हणत आहे की, "ही केवळ इन्शुरन्सची साधी केस आहे, कोर्टात फक्त एक तारीख लागेल, आमचा इन्शुरन्सचा वकील सर्व मॅनेज करेल आणि क्लेम पास झाल्यावर विषय संपून जाईल." यावरून हे स्पष्ट होते की, इन्श्युरन्सचे लाखो रुपये हडप करण्यासाठी आणि खतामधील भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक ईटीपी वेस्टच्या बेकायदेशीर रॅकेटवर पांघरूण घालण्यासाठी डंपर मालक एका निष्पाप आणि गरीब तरुणाच्या संपूर्ण आयुष्याची होळी करायला निघाला आहे.

​सुदर्शन कंपनीचे गेट आणि रोहा एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही ठरणार कळीचा मुद्दा

अपघाताच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता सदर डंपर धाटाव एमआयडीसीमधील 'सुदर्शन' कंपनीतून रासायनिक वेस्ट घेऊन निघाला होता. पोलिसांनी जर सुदर्शन कंपनीच्या गेटवरील आणि सुरक्षा विभागाचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले, तर डंपर चालवणाऱ्या त्या खऱ्या ड्रायव्हरचा चेहरा समोर येईल. दुसरीकडे, पंकज मिस्त्री याने अपघाताच्या वेळी तो भिसे खिंडीत नसून रोहा तालुक्यात अन्य ठिकाणी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी उपस्थित असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची आणि पंकजच्या मोबाईल लोकेशनची तांत्रिक पडताळणी केल्यास डंपर मालकाचा हा खोटा ड्रायव्हर उभा करून इन्शुरन्स लाटण्याचा कट कायदेशीररीत्या उधळून लावला जाऊ शकतो.

​फॉरेन्सिक तपासणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

सध्या रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल आहे, जो की अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. डंपर मालक किंवा संबंधित व्यक्तींनी जर ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा केला, तर पोलिसांनी या क्लिपची 'फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी' (FSL) कडे फॉरेन्सिक व्हाईस ॲनालिसिस आणि दूरसंचार कंपनीकडून कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) मागवून चौकशी करावी, अशी मागणी कायदेतज्ज्ञांकडून केली जात आहे. आता या प्रकरणात केवळ अपघाताचा तपास न करता, विम्याच्या लाखो रुपयांच्या पैशांचा अपहार करण्यासाठी आणि इन्श्युरन्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी खोटा आरोपी उभा करणाऱ्या डंपर मालकाविरुद्ध पोलिसांची फसवणूक करणे, खोटा पुरावा तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल होणार का? आणि पोलीस अधीक्षक या संपूर्ण प्रकरणाचा सखोल व पूरक तपास (Supplementary Investigation) करून खऱ्या दोषींना जेरबंद करणार का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक कॉल रेकॉर्डींग


Comments

Popular posts from this blog