आष्टा-सांगली महामार्गावर एसटी आणि मोटरसायकलचा अपघात; चालक जखमी
सुदैवाने जीवितहानी टळली
सांगली, दि. २५ (प्रतिनिधी) :- आष्टा-सांगली महामार्गावरील आष्टा येथे थोटे दूध डेअरीच्या जवळ एसटी बस आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघात घडल्यानंतर तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला उपचारासाठी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात घडला त्याच वेळी भारतीय दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलीप मोरे (भाऊ), सांगली जिल्हा संघटक दिलीप सोनवणे, वाळवा तालुका अध्यक्ष सुरेश मोहिते आणि वाळवा तालुका उपाध्यक्ष शंकर लोखंडे हे तेथून जात असताना उपस्थित होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. वाळवा तालुका अध्यक्ष सुरेश मोहिते यांनी या अपघाताबाबत आष्टा पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस दीपक पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांना सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई व वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

Comments
Post a Comment