ठाणे : वर्तकनगर पोलिसांची मोठी कारवाई!
वॅगनआर कारसह ३.१८० किलो गांजा जप्त, आरोपी जेरबंद
ठाणे, दि. २८ (प्रतिनिधी) :- ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अमली पदार्थ तस्करांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत मोठी कारवाई करत एका संशयित इसमाला जेरबंद केले आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीसीएस कंपनीकडून लेक शोर मॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मेघराज जाधव व त्यांचे अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. या गस्तीदरम्यान त्यांना टीसीएस कंपनी ते लेक शोर मॉल रस्त्याच्या कडेला एक वॅगनआर कार उभी असलेली आणि त्याजवळ एक इसम संशयास्पदरीत्या वावरत असताना आढळला. पोलिसांनी तात्काळ दोन पंचांसमक्ष एनडीपीएस कायद्यानुसार सदर इसमाची आणि त्याच्या वॅगनआर कारची झडती घेतली. या झडतीदरम्यान पोलिसांना कारमध्ये तब्बल ३.१८० किलोग्रॅम गांजा हा अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी अमली पदार्थासह गुन्ह्यात वापरलेली वॅगनआर कार जप्त केली असून या संपूर्ण मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत ४,१०,००० रुपये आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश दिलीप मोरे (वय ३० वर्षे, रा. रूम नं. ०३, साईनाथ नगर हनुमान चाळ, साईबाबा मंदिराजवळ, लुईस वाडी, वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०२/२२६, अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८(c), २०(b)ii (b) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक पाटोळे, पोलीस कॉन्स्टेबल सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल नागरे आणि पोलीस कॉन्स्टेबल कात्राबाद यांच्या पथकाने केली असून वर्तकनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Post a Comment