मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

​पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह तिघांना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक


​मुंबई, दि. २२ (रणजीत मस्के) :- पश्चिम बंगालमधील हावडा येथील शिबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भीषण गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि त्याच्या दोन साथीदारांना मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाने देवनार परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे आरोपी मुंबईत आपली ओळख लपवून राहत होते. या कारवाईनंतर आता पुढील तपासासाठी आरोपींना पश्चिम बंगालच्या शिबपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

​याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दिनांक ७ मे २०२६ रोजी पश्चिम बंगालमधील शिबपूर पोलीस ठाणे, हावडा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय हत्यार कायदा तसेच स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आणि त्याचे इतर साथीदार गुन्हा घडल्यापासून पश्चिम बंगालमधून फरार झाले होते. हे आरोपी मुंबईत येऊन स्वतःचे अस्तित्व लपवत देवनार येथील एकता एसआरए बिल्डिंगमधील एका खोलीत आश्रय घेऊन राहत असल्याची खात्रीलायक माहिती २१ मे २०२६ रोजी मुंबई गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पोलीस पथकाने तांत्रिक आणि मानवी कौशल्यांचा अचूक वापर करून देवनार परिसरात सापळा रचला आणि मुख्य आरोपीसह इतर दोन आरोपींना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

​ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये ४० वर्षीय शमीम अहमद अब्दुल रशीद (रा. ४६३, जी.टी. रोड, शिबपूर, हावडा), ४३ वर्षीय जमील अख्तर अली (रा. ५१/१४ काबीज घाट रोड, शिबपूर, हावडा) आणि ४४ वर्षीय अफताब अनवर खुर्शीद अनवर (रा. २३, घाट रोड, शिबपूर, हावडा) यांचा समावेश आहे. मुंबई गुन्हे शाखेने या इसमांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी शिबपूर येथील गोळीबार व बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याचे कबूल केले. धक्कादायक बाब म्हणजे, हे तिन्ही आरोपी शिबपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर पाच गंभीर गुन्ह्यांमध्येही (गुन्हा रजिस्टर क्रमांक १८९/२०२६, १९०/२०२६, १९१/२०२६, १९२/२०२६ आणि १९३/२०२६) पोलिसांना हवे असलेले मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​ही अत्यंत महत्त्वाची आणि धडक कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) श्री. नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (डी पूर्व) श्री. निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, पोलीस उपनिरीक्षक बेळणेकर, पोलीस उपनिरीक्षक नार्वेकर यांच्यासह पोलीस अंमलदार भालेराव, वानखेडे, शिरसाठ, तुपे, डगळे, गायकवाड, बैलकर, बोढारे आणि पोलीस हवालदार चालक मगर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या अटकेची माहिती मिळताच शिबपूर पोलीस ठाण्याचे पथक मुंबईत दाखल झाले असून, गुन्हे शाखेकडून या तिन्ही आरोपींचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog