कर्जत तालुक्यातील पाषाणे रोडवरील 'वेल विशर' साईटच्या बिल्डरकडून १२ लाख ६० हजारांची फसवणूक!
नेरळ पोलिसांत गुन्हा दाखल
नेरळ-रायगड, दि. २८ (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील पाषाणे रोड येथे 'वेल विशर' साईटवर स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी आणि साक्षीदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने स्वतःला या साईटचा बिल्डर आणि डेव्हलपर असल्याचे सांगून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. १ एप्रिल २०२२ ते २६ मे २०२६ या कालावधीत हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार घडला असून, याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पाषाणे रोडवरील 'वेल विशर' नावाच्या गृहप्रकल्पातील पहिल्या १०० ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत रूम (घरे) विक्री करण्याचे आकर्षक आमिष फिर्यादी आणि त्यांच्यासोबतच्या साक्षीदारांना दाखवले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादी व साक्षीदारांनी संबंधित प्रकल्पात रूम बुकिंग करण्यासाठी वेळोवेळी एकूण १२ लाख ६० हजार रुपये आरोपीच्या बँक खात्यात जमा केले.
मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपीने ठरल्याप्रमाणे फिर्यादी व साक्षीदारांना 'वेल विशर' साईटवरील रूमचा ताबा दिला नाही. हक्काचे घर मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी बुकिंगची रक्कम परत मागितली असता, आरोपीने ती रक्कमही परत करण्यास नकार दिला. अशा प्रकारे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रूम किंवा बुकिंगची रक्कम न देता फिर्यादी आणि साक्षीदारांची फसवणूक करण्यात आली.
या फसवणूकप्रकरणी अखेर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११२/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२) आणि ३१९ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या करीत आहेत.

Comments
Post a Comment