महाडमध्ये दिवसाढवळ्या महिला मजुरावर हल्ला!
मोबाईल हिसकावून चोरटा पसार
महाड-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, कामावर जाणाऱ्या एका महिलेला वाटेत अडवून तिला जखमी करत मोबाईलची जबरी चोरी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी कोल (पोस्ट कोथेरी, ता. महाड) येथील रहिवासी असलेली महिला फिर्यादी नेहमीप्रमाणे आपल्या घरातून महाड शहराच्या दिशेने मोलमजुरीच्या कामासाठी पायी चालत निघाल्या होत्या. मौजे कोल ते शिरगाव यादरम्यान असलेल्या कोल नदीच्या पात्राजवळ त्या पोहोचल्या असता, पाठीमागून आलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
पोलादपूर येथील रहिवासी असलेल्या या आरोपीने फिर्यादी महिलेच्या पाठीवर पाठीमागून उडी मारली आणि त्यांची मान घट्ट पकडून त्यांना विळखा घातला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने क्रूरतेचा कळस गाठत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडाला आणि उजव्या हाताच्या मनगटाला जोरात चावा घेतला. या हल्ल्यात महिला जखमी झाली आणि वेदनेने विव्हळू लागली. याचाच फायदा घेत आरोपीने महिलेच्या हातातील सॅमसंग कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पोबारा केला.
भरदिवसा निर्जन स्थळाचा फायदा घेत करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे पीडित महिला अत्यंत भयभीत झाली होती. त्यांनी याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, आरोपीविरुद्ध महाड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९(६) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गर्जे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलीस आता फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागातून कामासाठी शहराकडे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Post a Comment