खोपोलीत बाजारपेठेतून २ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास!
अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
खोपोली-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गजबजलेल्या बाजारपेठेतून एका अज्ञात महिलेने दोन महिलांच्या पर्समधून तब्बल २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मामी खोपोली येथील स्थानिक बाजारपेठेत नेहमीप्रमाणे घरगुती सामान आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. बाजारपेठेत नागरिकांची मोठी वर्दळ होती. खरेदी करत असताना त्या मौजे खोपोली येथील हनुमान मंदिराला लागूनच असलेल्या एका भांड्यांच्या स्टॉलजवळ आल्या. तिथे सामानाची पाहणी करत असतानाच, बाजारातील गर्दीचा गैरफायदा घेऊन एका अज्ञात भामट्या महिलेने फिर्यादी महिलांचे लक्ष विचलित केले.
त्यानंतर त्या अज्ञात महिलेने अत्यंत चालाखीने फिर्यादीच्या जवळील पर्सची चैन चोरून उघडली. पर्समध्ये ठेवलेले एकूण २,८०,००० रुपये किमतीचे मौल्यवान सोन्याचे दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या हेतूने चोरून काढले आणि ती गर्दीचा फायदा घेत तिथून पसार झाली. काही वेळाने फिर्यादी महिलेला आपल्या पर्सची चैन उघडी असल्याचे आणि त्यातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. बाजारपेठेत शोध घेऊनही संशयित महिला मिळून आली नाही, ज्यामुळे आपली फसवणूक आणि चोरी झाल्याचे महिलांच्या निदर्शनास आले.
आपल्या मौल्यवान दागिन्यांची चोरी झाल्याचे समजताच महिलांनी तात्काळ खोपोली पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेबाबत खोपोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून, अज्ञात महिलेविरुद्ध खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १८६/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे बाजारपेठेतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांमार्फत संशयित महिला चोराचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास पोलीस हवालदार दबडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून ते पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Comments
Post a Comment