मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

माणगांवच्या छत्रपती करिअर अकॅडमीची चमक!
नागावच्या शेतकरी कन्येची पुणे पोलीस दलात उत्तुंग भरारी


रायगड, दि. ३१ (प्रतिनिधी) :- महाड तालुक्यातील नागाव येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील कन्या कु. सिया सकपाळ हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पुणे पोलीस दलात निवड मिळवून संपूर्ण गावाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे नागाव गावातून पोलीस सेवेत दाखल होणारी ती पहिलीच युवती ठरली असून, तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. अत्यंत साध्या आणि प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या सियाने आपले प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नागाव येथून पूर्ण केले, तर पुढील पदवीचे उच्च शिक्षण तिने आंबेडकर कॉलेज, महाड येथून यशस्वीरीत्या पूर्ण केले.









​सियाला लहानपणापासूनच अंगावर पोलीस वर्दी परिधान करण्याचे आणि देशसेवा करण्याचे मोठे स्वप्न होते. हेच स्वप्न उराशी बाळगून तिने स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी सुरू केली. मात्र, या प्रवासात तिला सुरुवातीला सलग दोन वेळा अपयशाचा सामना करावा लागला होता. असे असूनही तिने अजिबात हार मानली नाही आणि अधिक जिद्दीने व आत्मविश्वासाने आपली तयारी सुरूच ठेवली. आपल्या या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी तिने माणगांव येथील छत्रपती करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. छत्रपती करिअर अकॅडमीतून दर्जेदार मार्गदर्शन घेतलेले अनेक विद्यार्थी आज पोलीस दलात भरती झालेले असून, संस्थेच्या या उत्तुंग कामगिरीमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात या छत्रपती करिअर अकॅडमी विषयी एक आदराचे आणि विश्वासाचे स्थान निर्माण झाले आहे. याच नामांकित संस्थेत सियाने अत्यंत कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षण पूर्ण केले. या खडतर प्रवासात तिला माजी पोलीस अधिकारी निवास साबळे यांचे अत्यंत मोलाचे आणि योग्य मार्गदर्शन लाभले, ज्याचा फायदा तिला तिच्या मैदानी व लेखी परीक्षेत झाला.









​अखेर तिच्या या अविरत कष्टाला, सातत्याला आणि अकॅडमीच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाला तिसऱ्या प्रयत्नात यश आले आणि तिने पुणे पोलीस दलात आपले मानाचे स्थान निश्चित केले. सियाचे आई-वडील हे शेतकरी असून घरात अत्यंत बेताची परिस्थिति असतानाही त्यांनी कधीही तिच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता त्यांनी आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिच्या शिक्षणासाठी आणि तिच्या स्वप्नपूर्तीसाठी मोठे आर्थिक व मानसिक पाठबळ दिले. सियाने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे सध्या संपूर्ण नागाव परिसरामध्ये अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींनी जर मनात आणले तर ते कोणत्याही शिखरावर पोहोचू शकतात, याचेच उत्तम उदाहरण देत सिया आज ग्रामीण भागातील इतर अनेक गरजू आणि महत्त्वाकांक्षी मुलींसाठी एक मोठा प्रेरणास्थान ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog