मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

आयशर टेम्पोच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू!
रोहा-नागोठणे रस्त्यावरील भिसे खिंडीतील अपघातानंतर चालक फरार


​रोहा-रायगड, दि. २७ (प्रतिनिधी) :- रोहा-नागोठणे रस्त्यावरील भिसे खिंडीतील घाटात एका भरधाव आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कमल मारिमुतु (वय २२) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. मंगळवारी, दिनांक २६ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला आहे.

​याबाबत सविस्तर वृत्त असे की, मृत तरुण कमल मारिमुतु हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक एम एच ०६ बी झेड ८३६४) घेऊन नागोठणे बाजूकडून रोहा बाजूकडे चालला होता. दरम्यान, याच वेळी रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे भिसे खिंड येथे रोहा-नागोठणे रस्त्यावरील वळणावर समोरून एक अज्ञात चालक त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्रमांक एम एच ०४ एल वाय ७३५५) घेऊन येत होता. संबंधित चालकाला हा रस्ता तीव्र वळणाचा आणि घाटाचा आहे याची पूर्ण कल्पना असतानाही, त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. चालकाने आपला आयशर टेम्पो अत्यंत अविचाराने, हयगयीने आणि बेदरकारपणे भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या कमल मारिमुतु यांच्या मोटारसायकलला घाटातील वळणावर जोरदार धडक दिली.

​ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कमल मारिमुतु यास गंभीर लहान-मोठ्या दुखापती झाल्या आणि या गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आयशर टेम्पो आणि मोटारसायकल या दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर माणुसकी दाखवून जखमीला मदत करणे किंवा पोलिसांना अपघाताची खबर देणे गरजेचे असताना, अज्ञात आयशर चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला.

​या अत्यंत गंभीर घटनेप्रकरणी मृत कमल याच्या नातेवाईकाने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून रोहा पोलिसांनी अज्ञात आयशर चालकाविरुद्ध रोहा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १४०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या अज्ञात आयशर चालकाचा शोध पोलीस घेत असून, या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक (भा.पो.से.) श्री. सुयश कुमार सिंह हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog