वडवली-श्रीवर्धनमध्ये विनापरवाना स्फोटकांचा साठा जप्त
दिघी सागरी पोलीसांकडून दोघांवर गुन्हा दाखल
रायगड, दि. १ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणाने जिलेटीनच्या कांड्या बाळगणाऱ्या दोन इसमांवर दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वडवली गावच्या हद्दीत करण्यात आली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वडवली येथील शेत गट क्रमांक २५० मध्ये, जो आरोपी क्रमांक १ याच्या मालकीचा आहे, तिथे विनापरवाना ब्लास्टिंग करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी संगनमत करून कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता स्फोटक साठा जमवल्याचे उघड झाले. या कारवाईत पोलीसांनी १,३४० रुपये किमतीच्या एकूण ६२ जिलेटीनच्या कांड्या आणि इलेक्ट्रिक वायर जप्त केल्या आहेत.
सदर आरोपींनी हे स्फोटक पदार्थ अत्यंत हयगयीने आणि कोणतीही सुरक्षा मानके न पाळता स्वतःच्या ताब्यात ठेवले होते. लोकवस्तीच्या जवळ किंवा शेतजमिनीत अशा प्रकारे स्फोटकांचा साठा करणे हे मानवी जीवितास आणि सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण करणारे असल्याचा ठपका ठेवत पोलीसांनी ही कठोर कारवाई केली आहे.
याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि स्फोटक पदार्थ अधिनियम १८८४ च्या कलम २८८, १२५, २२३, ३(५), ९(B) आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर्षद शेख हे करीत असून, या स्फोटकांचा पुरवठा नक्की कुठून झाला आणि त्यांचा वापर नेमका कशासाठी केला जाणार होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Comments
Post a Comment