मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

कर्जतच्या भिसेगाव येथील अंबेभवानी मंदिरात चोरी
 दानपेटी फोडून रोकड लंपास 


​कर्जत-रायगड, दि. ८ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरालगत असलेल्या भिसेगाव येथील प्रसिद्ध अंबेभवानी मंदिरात चोरीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दानपेटीतील रोख रकमेवर डल्ला मारला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भिसेगाव येथील अंबेभवानी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. मात्र, संधी साधून अज्ञात आरोपीने रात्रीच्या सुमारास मंदिराच्या परिसरात प्रवेश केला. चोरट्याने गाभाऱ्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा एखाद्या जड हत्याराच्या सहाय्याने तोडला आणि तो थेट मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला.

​गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने तेथे असलेल्या स्टीलच्या दानपेटीचे लक्ष केले. दानपेटीला असलेले मजबूत लॉक तोडून त्यातील एकूण ५,५०० रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. हा प्रकार निदर्शनास येताच मंदिर व्यवस्थापनाकडून तातडीने कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली.

​याप्रकरणी कर्जत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सदर गुन्हा 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर हे करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात वाढत्या चोऱ्यांच्या सत्रामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog