मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पेण तालुक्यातील शिहू येथे शेतजमिनीच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी
कोयत्याने वार केल्याप्रकरणी नागोठणे पोलिसांत गुन्हे दाखल


नागोठणे-रायगड (प्रतिनिधी) :- पेण तालुक्यातील शिहू परिसरात वडिलोपार्जित शेतजमीन आणि शेतातील पाण्याच्या ओहोळाच्या बांधकामावरून दोन कुटुंबांत जुना वाद उफाळून आला असून, या वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाले आहे. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

​पहिली घटना शिहू (पो. बेणसे) येथे सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. येथील शेतजमिनीच्या कारणावरून आरोपी क्रमांक १ याच्या आईने फिर्यादी यांना उद्देशून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाने रौद्र रूप धारण केल्यानंतर आरोपी क्रमांक १ याने हातात धारदार कोयता घेऊन थेट फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला. आरोपीने फिर्यादीचा गळा दाबून धरला आणि उजव्या हातातील कोयत्याने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यानंतर आरोपी क्रमांक १ आणि २ या दोघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८-१, ११५-२, ३३३, १३१, ३५२ आणि ३-५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

​या घटनेच्या थोड्याच वेळ आधी, म्हणजे ७:३० वाजण्याच्या सुमारास शिहू येथेच दुसरी हिंसक घटना घडली. शेतातील ओहोळाच्या बांधकामावरून शेतात झालेल्या शाब्दिक चकमकीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या आईच्या घरासमोर धुमाकूळ घातला. रागाच्या भरात असलेल्या आरोपी क्रमांक २ याने फिर्यादीच्या वृद्ध आईला घराबाहेर ओढून अपमानित केले. त्याचवेळी आरोपी क्रमांक ३ हा हातात कोयता घेऊन फिर्यादीच्या अंगावर धावून गेला. स्वतःचा बचाव करण्यासाठी फिर्यादीने आरोपीचा कोयता पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या भांडणात आरोपी १ ते ३ यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला काठीने मारहाण करून जखमी केले. इतक्यावरच न थांबता, आरोपी क्रमांक २ ते ४ यांनी फिर्यादीच्या मुलाच्या गाडीची तोडफोड करून काचा फोडल्या आणि मोठे आर्थिक नुकसान केले.

​या दुसऱ्या घटनेप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८-१, ११५-२, ३५२, ३२४-४ आणि ३-५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा हे करीत असून, फरार आरोपींचा शोध आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे. एकाच दिवशी आणि एकाच गावात घडलेल्या या दोन हिंसक घटनांमुळे ग्रामीण भागात जमिनीच्या वादातून उद्भवणाऱ्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog