सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!
दोन पिस्तुलं व जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद
खुनाचा कट उधळला
सातारा वृत्त (रणजीत मस्के) :- सातारा जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात सातारा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांच्या मोठ्या साठ्यासह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन देशी बनावटीची पिस्तुलं, पाच जिवंत काडतुसे, सुरा आणि कुकरी असा एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संभाव्य खुनाचा कट वेळीच उधळून लावला आहे.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले होते. या सूचनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक घोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तैनात केले होते.
या कारवाईची पार्श्वभूमी अशी की, स्थानिक गुन्हे शाखेला त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार करण जोतिराम चव्हाण (वय २१, रा. डबेवाडी, ता. जि. सातारा) हा त्याच्या गावी शस्त्रांसह वावरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. सुमारे दीड वर्षांपूर्वी काही युवकांनी त्याला मारहाण केली होती, त्या जुन्या वैराचा बदला घेण्यासाठी आणि संबंधित तरुणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्रे जमवली होती. तो डबेवाडी येथील 'शूरवीर करिअर अकॅडमी' जवळ आपल्या विनाक्रमांक मोटारसायकलवर (MH-11-DS-8743) शस्त्रांसह थांबला असून त्याच्यासोबत इतर काही मुलेही असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच पोलिसांनी सापळा रचला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या पथकाने डबेवाडी परिसरात वेषांतर करून पाळत ठेवली. पोलिसांनीं चाहूल लागताच संशयित आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून अत्यंत शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये करण चव्हाण याच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुलं, पाच जिवंत काडतुसे, एक धारदार सुरा, दोन कुकरी, दोन मोबाईल संच आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वैमनस्यातून होणारा एक मोठा रक्तपात टाळण्यात पोलिसांनी यश आले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१(२), ५५ तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३(१), २५, ४ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही महत्वपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातीर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार अतीष घाडगे, राजू मुलाणी, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, सुजित भोसले, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, प्रवीण पवार, रविराज वर्णेकर आणि चालक शिवाजी गुरव व पंकज बेसके यांनी पार पाडली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कौतुक केले आहे.

Comments
Post a Comment