अलिबाग-रेवदंडा मार्गावर पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात
दोन तरुण जखमी
रेवदंडा, दि. १६ (प्रतिनिधी) :- अलिबाग-रेवदंडा मुख्य मार्गावर पालव फाट्याजवळील धोकादायक वळणावर एका भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी (रा. नाईकआळी, नागाव) आणि त्यांचे मित्र सर्वेश पाटील हे दोघे एम एच. ०६ सी बी. ५५८० क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून अलिबाग-रेवदंडा रोडने नागाव बाजूकडून रेवदंडा बाजूकडे जात होते. बागमळा येथील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असताना सर्वेश पाटील हा गाडी चालवत होता, तर फिर्यादी मागे बसले होते. रात्री २१:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी मौजे पालव फाट्याच्या पुढे असलेल्या वळणावर आली असता, समोरून म्हणजेच रेवदंडा बाजूकडून एम.एच. ०६ जे.यु. ५६६४ क्रमांकाचा महिंद्रा पिकअप टेम्पो अत्यंत भरधाव वेगात आला.
पिकअप चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि बेदरकारपणे चालवत रस्त्याच्या चुकीच्या बाजूला (रॉन्ग साईड) नेले. वळणावर नियंत्रण सुटल्याने या पिकअपच्या उजव्या बाजूच्या बंपरची जोरदार धडक समोरून येणाऱ्या दुचाकीला बसली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक दिल्यानंतर पिकअप टेम्पो रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर सर्वेश पाटील याच्या उजव्या हाताच्या दंडाला आणि उजव्या मांडीला तसेच गुडघ्याखाली लहान-मोठ्या स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. या अपघातात पिकअप चालकालाही किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५(अ), १२५(ब) (इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे व दुखापत करणे) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ अन्वये पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार थळे हे करीत आहेत.

Comments
Post a Comment