रत्नागिरी पोलीसांच्या 'RAIDS' ॲपची किमया; नागपुरातील अज्ञात मृतदेहाची अवघ्या दोन तासांत ओळख पटली
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतील 'RAIDS' ॲपमुळे गुन्हे तपासात मोठी क्रांती
रत्नागिरी, दि. ४ (प्रतिनिधी) :- आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलीसांच्या कल्पकतेचा मेळ बसल्यास गुंतागुंतीचे गुन्हे कसे सुटू शकतात, याचा प्रत्यय नुकताच नागपूर आणि रत्नागिरी पोलीसांच्या संयुक्त कामगिरीतून आला आहे. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या विशेष संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून विकसित करण्यात आलेल्या 'RAIDS' (रेड्स) या नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप्लीकेशनमुळे नागपूर येथे सापडलेल्या एका अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांच्या विक्रमी वेळेत पटवण्यात पोलीसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन आणि जंगलमय परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह काहीसा विद्रुप अवस्थेत असल्याने आणि घटनास्थळी कोणत्याही खुणा नसल्याने या व्यक्तीची ओळख पटवणे नागपूर पोलीसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले होते. तपासाची चक्रे फिरवण्यासाठी मृताची ओळख पटणे अनिवार्य होते, अशा परिस्थितीत नागपूर पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांशी संपर्क साधून तांत्रिक मदत मागितली.
यावेळी रत्नागिरी पोलीसांनी आपल्या ताफ्यातील अत्याधुनिक 'RAIDS' ॲपचा वापर केला. या ॲपमध्ये असलेल्या प्रगत तांत्रिक प्रणालीद्वारे मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण (Photo Reconstruction) करण्यात आले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चेहऱ्याचे मूळ स्वरूप पुन्हा तयार केल्यानंतर, त्या आधारे शोधमोहीम राबवण्यात आली. या प्रक्रियेचा सकारात्मक परिणाम असा झाला की, ज्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी दिवस लागले असते, ती ओळख अवघ्या दोन तासांच्या आत निष्पन्न झाली. तपासाअंती सदर मृत व्यक्ती नागपूरमधीलच आठवा मैल, दौलामेटी येथील रहिवासी असल्याचे समोर आले.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेले हे ॲप गुन्हे तपासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत आहे. या कारवाईने हे सिद्ध केले आहे की, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर तपासाची गती वाढवण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरतो. दोन जिल्ह्यांतील पोलीसांच्या या प्रभावी समन्वयाचे आणि रत्नागिरी पोलीसांच्या तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असून, या यशामुळे वाडी पोलीसांच्या तपासाला आता मोठी दिशा मिळाली आहे.

Comments
Post a Comment