मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 रत्नागिरीत देशातील पहिल्या 'स्वॅम्प पोलीस' गस्त उपक्रमाचा थाटात शुभारंभ... 🚨 शिरूरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; गावठी पिस्टलसह दोन सराईत गुन्हेगार जेरबंद... 🚨 रायगड पोलिसांची पुण्यात घुसून धडाकेबाज कारवाई; वीटभट्टी मालकाने मुलाला बनवले ओलीस, पोलिसांनी केली सुटका... 🚨 कोल्हापुरात १२ चोरीच्या मोटारसायकलींसह तीन अट्टल चोरट्यांना अटक... 🚨

पाली येथे भाविकाला मारहाण; कुत्र्याला हुसकावल्याच्या कारणावरून वाद


​पाली, दि. ९ (प्रतिनिधी) :- प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसरात एका भाविकाला बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या कुत्र्याला हुसकावल्याच्या शुल्लक कारणावरून एका व्यक्तीने भाविकावर जीवघेणा हल्ला चढवला असून, याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी हे श्री बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर येत होते. मंदिर परिसरातील अशोक मिनाले यांच्या पेढ्यांच्या दुकानासमोर आले असता, तिथे उभ्या असलेल्या आरोपीच्या कुत्र्याला फिर्यादी यांनी बाजूला होण्यासाठी हुसकावले. मात्र, आपल्या कुत्र्याला हुसकावल्याचा प्रचंड राग आरोपीला आला आणि त्याने क्षणाचाही विचार न करता फिर्यादींशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

​हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने फिर्यादी यांच्या कानशिलात लगावली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावून घेऊन त्याच काठीने त्यांच्या कमरेवर जोरात प्रहार केला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. मारहाण सुरू असतानाच आरोपीने अत्यंत हलगर्जीपणाने आणि निष्काळजीपणे फिर्यादीला जोराचा धक्का दिला. हा धक्का इतका भीषण होता की, फिर्यादी हे थेट मंदिराच्या पायऱ्यांजवळ असलेल्या पेढ्यांच्या दुकानाच्या लोखंडी कडीवर जाऊन आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून ते रक्तबंबाळ झाले.

​या हिंसक प्रकारानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी फिर्यादी यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध पाली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 40/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2) आणि 125(a) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास महिला पोलीस हवालदार म्हात्रे या करीत असून, पोलीस या घटनेचा सखोल पंचनामा करत आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog