ऑनलाईन गेमच्या नादापायी १५ वर्षांच्या मुलाने केली ६५ वर्षीय वृद्धेची लूट!
पोयनाड पोलिसांनी २४ तासांत उघडकीस आणला जबरी चोरीचा गुन्हा
रोहा-रायगड (विशेष प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या १५ वर्षांच्या एका मुलाने '91 Club' या ऑनलाईन गेमच्या व्यसनासाठी हा गंभीर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोयनाड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घटनेचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील वाघविरा येथे ही घटना घडली. ६५ वर्षीय फिर्यादी आशा चंद्रकांत पाटील या आपल्या नातेवाईकांच्या बंद घराच्या आवारात फुले तोडत होत्या. यावेळी निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेल्या एका अज्ञात इसमाने मागून येऊन अचानक त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्याने या वृद्ध महिलेचे तोंड आणि डोळे दाबून त्यांना फरफटत घराच्या पाठीमागे नेले आणि जमिनीवर पाडले. पीडित महिलेने आरडाओरडा करू नये म्हणून तिचे तोंड दाबून धरले आणि तिच्या गळ्यातील ९०,००० रुपये किमतीचा ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार जबरीने तोडून चोरटा पसार झाला.
पोलिसांची तातडीची कारवाई
या घटनेची फिर्याद त्याच रात्री पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक तपासाची मदत घेतली. फिर्यादीने दिलेल्या वर्णनावरून आणि संशयिताच्या हालचालींवरून पोलिसांनी कुसुंबळे येथीलच एका १५ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
ऑनलाईन गेमचे भयंकर व्यसन
पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. तपासात असे समोर आले की, या मुलाला '91 Club' या ऑनलाईन गेमचे प्रचंड व्यसन जडले होते. या गेममध्ये पैसे हारल्यामुळे आणि गेम खेळण्यासाठी पैशांची अत्यंत गरज भासल्यामुळे त्याने हा चोरीचा मार्ग निवडला. पोलिसांनी या मुलाकडून चोरीला गेलेला ७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार जप्त केला असून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
पालकांसाठी धोक्याची घंटा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी पालकांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. सध्याच्या काळात लहान मुले ऑनलाईन गेममध्ये पालकांचे पैसे खर्च करत असून, त्याचे रूपांतर हळूहळू गुन्हेगारी प्रवृत्तीत होत आहे. गेममध्ये सुरुवातीला 'फ्री' असे आमिष दाखवले जाते, परंतु नंतर पैशांची मागणी केली जाते. मुलांना पैशांची किंमत नसल्याने ते पालकांचे कार्ड किंवा UPI वापरून गेम खरेदी करतात. यातूनच मानसिक ताण, अभ्यासावर परिणाम आणि चोरीसारख्या मार्गांचा अवलंब केला जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पालकांनी आपल्या मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा ठेवावी, प्ले स्टोअरमध्ये 'पॅरेंटल कंट्रोल' सुरू ठेवावे आणि मुलांच्या मोबाईलमधील व्यवहारांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment