मयत व्यक्तीला जिवंत दाखवून १० एकर जमिनीचा अपहारसहा जणांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कर्जत, दि. २ (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील बोरगाव येथील एका मृत व्यक्तीला जिवंत भासवून, त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून सुमारे १० एकर जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नेरळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मौजे बोरगाव येथील जमीन सर्वे नंबर ४/९ (७९ आर), १८/७ (१ हेक्टर १७ आर), १८/४/ब (१ हेक्टर ९ आर) आणि १८/४/अ (१ हेक्टर ९ आर) अशा एकूण सुमारे १० एकर जमिनीचे मूळ मालक हे बोरगावचे रहिवासी होते. सदर जमीन मालकाचा सन २००७ मध्ये मृत्यू झाला होता. मात्र, जमिनीवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने मुख्य आरोपीने (आरोपी क्र. १) अन्य साथीदारांच्या मदतीने एक मोठा कट रचला.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २००८ ते ३१ डिसेंबर २००९ या कालावधीत हा गैरप्रकार घडला. मूळ जमीन मालक मयत असतानाही ते हयात आहेत असे भासवण्यात आले. त्यांच्या जागी एका अनोळखी व्यक्तीला (आरोपी क्र. २) उभे करून बनावट ओळख निर्माण करण्यात आली. या बनावट व्यक्तीच्या आधारे जमिनीचा विक्री परवाना मिळवून कधीही रद्द न होणारे कुलअखत्यारपत्र (पावर ऑफ अॅटर्नी) आणि रजिस्टर साठेकरारनामा करून घेण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेत कायदेशीर दस्तऐवजावर बोरगाव येथील बळीराम शंकर पाटील आणि अमोल अनंत देशमुख यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षऱ्या केल्या.
एवढ्यावरच न थांबता, मुख्य आरोपीने ही जमीन स्वतःच्या नावे खरेदीखत करून घेताना नेरळ येथील एका व्यक्तीला आणि मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला साक्षीदार म्हणून सामील करून घेतले. या पद्धतशीरपणे रचलेल्या जाळयात कल्याण येथील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम २०२३ च्या कलम १७५(३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १७७, १९८, २००, २०३, ३८३, ३९०, ४१५, ४६३, ४६४, ४६६, ४७० आणि ४७४ प्रमाणे सहा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील शेंबडे हे करीत असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Post a Comment