नाशिक पोलिसांची मोठी कारवाई!
अंबडमधील कंपनीतील १० लाखांची चोरी उघड, कारसह मुद्देमाल जप्त
नाशिक वृत्त, दि. २५ (रणजीत मस्के) :- नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत, एका कंपनीतून झालेल्या मोठ्या चोरीचा छडा लावला आहे. फेअरडील इलेक्ट्रीकल अँड इंजिनिअरिंग प्रा. लि. या कंपनीतून चोरलेली नऊ लाखांहून अधिक किमतीची कॉपर वायर आणि गुन्ह्यात वापरलेली कार, असा एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, कॉलेज रोड परिसरातील रहिवासी असलेले व्यावसायिक दिनेश शांतेस्वरुप दवे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १९ एप्रिल २०२६ च्या सायंकाळपासून ते २० एप्रिलच्या सकाळपर्यंतच्या कालावधीत, अंबड एमआयडीसीमधील त्यांच्या 'फेअरडील इलेक्ट्रीकल' कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी ९ लाख ३४ हजार रुपये किमतीची ट्रान्सफार्मर कॉपर कॉईलची वायर चोरून नेली होती. या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा तातडीने तपास करून आरोपींना शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदार फरीद इनामदार, तुषार मते, मयूर पवार आणि अनिल गाढवे यांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले.
या तपासादरम्यान पोलिसांना संशयित आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी संजय पांडुरंग सकट (वय ३२, रा. महालक्ष्मीनगर, नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने या चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली ९ लाख ३४ हजार रुपयांची कॉपर वायर हस्तगत केली. तसेच, चोरीचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेली १ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी अल्टो कार (क्रमांक एम एच. १५- बी एक्स ०३१३) असा एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या यशस्वी कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगेंद्रसिंग राजपूत यांच्यासह सपोनि विलास पडोळकर, पोलीस हवालदार सुभाष ठुबे, पोलीस शिपाई अनिल गाढवे, तुषार मते, फरीद इनामदार आणि उल्हास गांगुर्डे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि पोलीस शिपाई वैभव एखंडे करत आहेत. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment