मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 मुंबईत गुन्हा करून गोव्याच्या दिशेने पळणाऱ्या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक! गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि पोलादपूर पोलिसांची मुंबई-गोवा हायवेवर धाडसी कारवाई... 🚨

कर्जतमध्ये भरधाव डंपरने झोपलेल्या मजुरांना चिरडले!
एकाचा दुर्दैवी मृत्यू, चालक अटकेत


कर्जत, दि. २२ (प्रतिनिधी) :- कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालधे परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका २० वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. म्हात्रे क्वारी परिसरात झोपलेल्या दोन मजुरांच्या अंगावरून भरधाव डंपर गेल्याने हा थरार घडला. या घटनेत अन्य एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास मौजे नालधे येथील म्हात्रे क्वारीच्या ऑफिस शेजारील मोकळ्या मैदानात घडली. फिर्यादी आणि त्यांचे सहकारी बाबूलाल सरदार (वय २० वर्षे, रा. दागाम, जि. ईस्ट सिंगभूम) हे दोघेही म्हात्रे क्वारीमध्ये मजूर म्हणून काम करत होते. दिवसभराचे काम आटोपून रात्री थकावट असल्याने ते दोघेही क्वारीच्या ऑफिसजवळील मोकळ्या मैदानात झोपण्यासाठी गेले होते. झोपण्यापूर्वी फिर्यादी हे आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते, तर बाबूलाल हे त्यांच्या शेजारीच झोपले होते.

​त्याच वेळी म्हात्रे क्वारीवर चालक म्हणून काम करणारा आरोपी हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा डंपर (क्रमांक: एम.एच. ०५ बी.आर २१००) घेऊन क्वारीमधून बाहेर पडला. हा डंपर पार्किंग करण्यासाठी नेत असताना चालकाने तो अत्यंत वेगाने आणि निष्काळजीपणे चालविला. मैदानात लोक झोपलेले आहेत याचा कोणताही विचार न करता चालकाने डंपर थेट मैदानात घुसवला. यावेळी डंपरची जोराची धडक बसल्याने फिर्यादीच्या डाव्या पायाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. मात्र, याहीपेक्षा भीषण प्रसंग बाबूलाल सरदार यांच्यावर ओढवला. डंपरचे पुढचे चाक थेट बाबूलाल यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना अत्यंत गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृत बाबूलाल हा मूळचा झारखंड राज्यातील रहिवासी असल्याचे समजते.

​या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(a), १२५(b) सह मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ आणि १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धबडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. या घटनेमुळे मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog