कर्जतमध्ये रेंज रोव्हर आणि स्कुटीच्या धडकेवरून राडा!
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल
कर्जत-रायगड, दि. २४ (प्रतिनिधी) :- कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडाव परिसरात वाहन धडकल्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या या राड्याप्रकरणी दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारींनुसार कर्जत पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेतील फिर्यादी हे आपल्या एम एच ४६ बी जी ५२५८ क्रमांकाच्या स्कुटीवरून वंजारवाडी येथील घराकडे जात होते. ते कडाव येथील कळमकर पेट्रोल पंपच्या गेटसमोर आले असता, समोरून येणाऱ्या एम एच ०४ एफ ए ०९०९ या क्रमांकाच्या रेंज रोव्हर गाडीने त्यांच्या स्कुटीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे फिर्यादी गाडीवरून खाली पडले, मात्र रेंज रोव्हर चालकाने गाडी न थांबवता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने तात्काळ आपली स्कुटी उचलून त्या आलिशान गाडीचा पाठलाग केला आणि काही अंतरावर आपली गाडी आडवी लावून त्यांना थांबवले. यावेळी झालेल्या वादात रेंज रोव्हरमधील प्रवाशांनी खाली उतरून फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका आरोपीने फिर्यादीच्या उजव्या कानावर आणि दातावर जोरात फाईट मारली, तर एका महिला आरोपीने पोटावर लाथा मारल्या. इतक्यावरच न थांबता रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडी काठीने फिर्यादीच्या हातावर वार करून त्यांना दुखापत करण्यात आली. या तक्रारीवरून कर्जत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १८८/२०२६ नुसार दाखल केला आहे.
दुसरीकडे, याच घटनेसंदर्भात रेंज रोव्हरमधील महिला फिर्यादीने देखील प्रति-तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, त्या आपल्या कुटुंबीयांसह कशेळे येथील 'सिक्रेट व्हिला' कडे जात असताना कडावजवळ गाडी वळवत होत्या. त्याच वेळी स्कुटीवरील चालकाने त्यांच्याजवळ येऊन विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्याकडे दुर्लक्ष करून गाडी वळवली आणि त्यांचा भाऊ काही खरेदी करण्यासाठी गाडीतून खाली उतरला असता, स्कुटी चालकाने जाणूनबुजून आपली गाडी त्याच्या पायावर घातली. या प्रकारानंतर जेव्हा फिर्यादी आणि त्यांचे वडील मध्यस्थीसाठी उतरले, तेव्हा संबंधित आरोपीने त्यांचा गळा आणि शर्ट पकडून वडिलांच्या गालावर चापट मारली. तसेच जमिनीवर पडलेला दगड पाठीत मारून झाडाच्या कुंडीने भावाच्या मनगटावर प्रहार केला. या वादात लायटरचा वापर करूनही दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, इतर काही व्यक्तींना जमवून बेकायदेशीर जमाव जमवत रेंज रोव्हर गाडीवर दगडफेक आणि वीटफेक करून गाडीचे नुकसान केल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या दुसऱ्या तक्रारीवरून कर्जत पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर १८९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९०, ३५१(२), ३५२ आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील किरकोळ अपघातातून सुरू झालेल्या या वादाने हिंसक वळण घेतल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. किरण नवले हे करत असून, नेमकी चूक कोणाची होती आणि हा वाद नेमका कसा चिघळला, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत.

Comments
Post a Comment