श्रीवर्धनमध्ये गोवंशीय मांसाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक!
जसवली फाट्याजवळ पोलिसांची कारवाई
श्रीवर्धन-रायगड, दि. २३ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित गोवंशीय प्राण्यांच्या मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास घडली. म्हसळा ते श्रीवर्धन या मुख्य रस्त्यावरून एका दुचाकीवरून प्रतिबंधित मांसाची वाहतूक होणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार श्रीवर्धन तालुक्यातील जसवली फाट्याजवळ पोलिसांनी पाळत ठेवली असता, आराठी मोहल्ला, श्रीवर्धन येथील रहिवासी असलेला एक संशयित इसम त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या स्कूटीवरून (क्रमांक एम एच ०६ सी डब्ल्यू ४५८१) जात असताना दिसून आला.
पोलिसांनी त्याला अडवून गाडीची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेले प्रतिबंधित गोवंशीय प्राण्यांचे मांस बेकायदेशीररित्या आढळून आले. हे मांस मानवी वापरासाठी आणि कायद्याने प्रतिबंधित असतानाही त्याची छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी व मांस जप्त केले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर आरोपीला २२ एप्रिल रोजीच दुपारी १५:४४ वाजण्याच्या सुमारास रीतसर अटक करण्यात आली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवीन भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९७६ आणि २०१५ मधील सुधारित कायद्यानुसार कलम ६, ५, ५(क), ९, ९(अ), आणि ११ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करत असून, यामागे आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. श्रीवर्धन पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध मांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Post a Comment