मुख्य संपादक : किशोर केणी, सहसंपादक : दिनेश चांगू मोरे, उपसंपादक : किरण लक्ष्मण मोरे
ब्रेकिंग न्यूज
🚨 डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडिया न्यूज चॅनेल्सना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक! 🚨

कुलाबा कोळीवाडा येथील खंडोबा मंदिरातील मूर्ती चोरीचा गुन्हा उघड
कुलाबा पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद


​मुंबई, दि. १५ (रणजीत मस्के) :- कुलाबा येथील कोळीवाडा भागातील ऐतिहासिक खंडोबा मंदिरातून देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीला गेल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली होती. या प्रकरणाचा अत्यंत संवेदनशीलतेने आणि कौशल्याने तपास करत कुलाबा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महेश नंदकुमार चायनाखवा (वय ४१, रा. रेवदंडा, अलिबाग) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मूर्तींचे वितळवलेले चांदीचे बिस्किटे आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण ५ लाख ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दोन ते पाचच्या सुमारास अज्ञात चोरट्याने खंडोबा मंदिरात प्रवेश करून खंडोबा देव, भैरी देव, एकवीरा देवी आणि तुळजा भवानी देवी यांच्या सुमारे ५ किलो ६०४ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मंदिर हे स्थानिक नागरिकांच्या श्रद्धेचे स्थान असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर देशमुख यांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली होती.
​तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे ३० ते ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तसेच पोलिसांची दोन पथके गेल्या चार दिवसांपासून अलिबाग आणि पनवेल भागात आरोपीचा शोध घेत होती. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली की, मूर्तींची चोरी करणारा आरोपी हा चोरीचा माल विकण्यासाठी मुंबईतील झवेरी बाजारात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी झवेरी बाजार परिसरात सापळा रचला आणि संशयित आरोपी महेश चायनाखवा याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीच्या चांदीच्या मूर्ती वितळवून तयार केलेली दोन चांदीची बिस्किटे आणि गुन्ह्यात वापरलेली लोखंडी हातोडी, पत्रा कापण्याचे कटर, एक्सॉ ब्लेड, छन्नी यांसारखी हत्यारे मिळून आली.
​पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. अटक करण्यात आलेला आरोपी महेश चायनाखवा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी रेवदंडा आणि पेण पोलीस ठाण्यात चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक निलेश बोंद्रे, अंकुश जाधव, अविनाश मोरे आणि त्यांच्या पथकाने केली असून, यामध्ये गुन्हे शाखा व लोहमार्ग पोलीस दलातील सहकाऱ्यांचीही महत्त्वाची मदत लाभली. पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपीला अटक केल्यामुळे कुलाबा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog