रसायनी पोलिसांनी उलगडला हिरानंदानी सिटीतील चोरीचा गुन्हा!
२४ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
रसायनी-रायगड (प्रतिनिधी) :- रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरानंदानी फॉरच्युन सिटी, भोकरपाडा येथून ६ लाख ३० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनिअम सेंट्रींग प्लेट्सची चोरी करणाऱ्या टोळीचा रसायनी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
२५ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास १० ते १२ अज्ञात आरोपींनी संगणमत करून २ टन वजनाच्या अॅल्युमिनिअम सेंट्रींग प्लेट्स टेम्पोमध्ये भरून लंपास केल्या होत्या. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.
या गुन्ह्याचा तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास करण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत भुजबळ यांनी दोन विशेष तपास पथकांची नियुक्ती केली होती. पहिल्या पथकात पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्यासह पोलीस उप-निरीक्षक मंगेश बाचकर, सहाय्यक फौजदार आणि पोलीस हवालदार लालासाहेब कोळेकर, नितीन शेडगे, पोलीस शिपाई वैभव होले, गिरीष नगरकर, रवींद्र कुंभार यांचा समावेश होता. तर दुसऱ्या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, पोलीस हवालदार हेमंत कोकाटे, सुशांक पिंगळे, सचिन चौरे आणि हरिश्चंद्र मेहत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तपासादरम्यान टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी संशयीत टेम्पोचा मागोवा घेतला. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी टेम्पोची नंबर प्लेट काळी केली होती, मात्र पोलिसांनी सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचून विकास रामपाल वाल्मिकी (वय २६) आणि आताउल्ला उर्फ यासीन अमजलअली खान (वय २५) या दोघांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल आणि दोन टेम्पो तसेच एक कार जप्त करण्यात आली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे रायगड पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने बांधकाम व्यावसायिक आणि सोसायट्यांना आवाहन केले आहे की, कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक तैनात करावेत आणि जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत जेणेकरून गुन्हेगारांवर वचक बसेल. परिसरात कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment