डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून रायगड पोलिसांना बॅरीकेड्स आणि ब्रेथ अॅनलायझर मशिन भेट
अलिबाग-रायगड, दि. १९ (प्रतिनिधी) :- रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्याचा वारसा जपणाऱ्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस दलाला मोलाचे सहकार्य करण्यात आले आहे. जिल्ह्याची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिष्ठानच्या सौजन्याने शुक्रवारी, १७ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या प्रमाणात बॅरीकेड्स आणि अत्याधुनिक ब्रेथ अॅनलायझर मशिनचे वाटप करण्यात आले. अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हे साहित्य पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, श्री. उमेशदादा धर्माधिकारी आणि श्री. राहुलदादा धर्माधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने एकूण ६१५ बॅरीकेड्स आणि १६ ब्रेथ अॅनलायझर मशिन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आल्या. प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत पोलीस दलाला केलेल्या या मदतीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियमन अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे.
प्रतिष्ठानकडून प्राप्त झालेले ६१५ बॅरीकेड्स हे संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. विशेषतः सण, उत्सव आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांदरम्यान होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी या बॅरीकेड्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. याचबरोबर, रायगड जिल्ह्यामध्ये वाढणाऱ्या गंभीर आणि प्राणांतिक रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानने दिलेले १६ ब्रेथ अॅनलायझर मशिन अत्यंत कळीचे ठरणार आहेत. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस या मशिनच्या साहाय्याने अधिक प्रभावी कारवाई करू शकतील. ही सर्व उपकरणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना गरजेनुसार वितरित केली जाणार आहेत.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे पोलीस दलाला मिळालेले पहिलेच सहकार्य नसून, यापूर्वीही २७ मार्च २०२५ रोजी प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस कल्याण निधीसाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. प्रतिष्ठानकडून वारंवार मिळणाऱ्या या पाठबळामुळे पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी याबद्दल प्रतिष्ठानचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल जिल्ह्यासाठी अत्यंत भूषणावह ठरत आहे.

Comments
Post a Comment